अनाथ मुलांच्या उपचारात अडथळ्यांची शर्यत

शर्मिला वाळुंज
बुधवार, 15 एप्रिल 2020

आमच्या येथे असलेल्या मुलांची तपासणी, लस देण्यासाठी त्यांना एक दिवसाआड डॉक्टरांकडे न्यावे लागते. परंतु ठिकठिकाणी वाहतूक पोलिस संस्थेच्या रिक्षाचालकास अडवतात. परवानगीचे पत्र दाखवले तरीही अनेकदा पोलिस ठाण्याची हद्द वेगळी असल्याने रिक्षाचालकास 'नो सिग्नल' दाखविला जातो. यामुळे डोंबिवलीतील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेतील मुलांच्या उपचारात अडथळे निर्माण होत आहेत. सध्या ट्रस्टमध्ये फळे आणि भाज्यांचाही तुटवडा जाणवत असून याकडे लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासनाचे लक्ष नसल्याची खंत जननी आशिष संस्थेने 'सकाळ'कडे व्यक्त केली आहे.

ठाणे : आमच्या येथे असलेल्या मुलांची तपासणी, लस देण्यासाठी त्यांना एक दिवसाआड डॉक्टरांकडे न्यावे लागते. परंतु ठिकठिकाणी वाहतूक पोलिस संस्थेच्या रिक्षाचालकास अडवतात. परवानगीचे पत्र दाखवले तरीही अनेकदा पोलिस ठाण्याची हद्द वेगळी असल्याने रिक्षाचालकास 'नो सिग्नल' दाखविला जातो. यामुळे डोंबिवलीतील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेतील मुलांच्या उपचारात अडथळे निर्माण होत आहेत. सध्या ट्रस्टमध्ये फळे आणि भाज्यांचाही तुटवडा जाणवत असून याकडे लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासनाचे लक्ष नसल्याची खंत जननी आशिष संस्थेने 'सकाळ'कडे व्यक्त केली आहे.

क्लिक करा : लॉकडाऊन वाढल...सामान्यांचे बजेटही कोलमडले

रस्त्यांवर सोडून दिलेल्या तान्ह्या मुलांचा सांभाळ करून त्यांना दत्तक योजनेद्वारे पालक मिळवून देण्याचे काम डोंबिवली येथील 'जननी आशिष' ही संस्था गेल्या तीन दशकांहून अधिक काळ करीत आहे. या संस्थेत सध्या 28 मुले दाखल असून, या मुलांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जात आहे. संस्थेत सध्या 7 कर्मचारी आणि 1 सुरक्षा रक्षक आहे. संसर्गाची बाधा संस्थेतील मुलांपर्यंत पोहोचू नये यासाठी या सर्वांची रहाण्याची व्यवस्था संस्थेतच करण्यात आली आहे. सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आरोग्यापासून सर्वांगीण विकासाची काळजी संस्थेतर्फे घेतली जात आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊन काळात मुलांना कोणतीही कमतरता भासू नये याची पूर्णतः काळजी घेण्यात येत असल्याचे संस्थाचालक सांगतात. किराणा बाजार आम्ही भरून ठेवला आहे.

परंतु लॉकडाऊन वाढवल्याने सध्या येथील मुलांना फळे आणि भाज्या आम्ही देऊ शकत नाहीत. संस्थेच्या बाहेर पूर्वी येणारी भाजी, फळांची गाडी आता बंद झाली आहे. मुलांच्या आरोग्य चांगले रहावे यासाठी संस्थेतील कर्मचाऱ्यांना वारंवार बाहेर पाठवूही शकत नाही. पूर्वी देणगी व इतर प्रक्रिया सुरू असल्याने अनेक दानशूर व्यक्ती फळे, आवश्यक साहित्य मुलांना दान करीत होते. आता लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे संस्थाचालक सांगतात. 

क्लिक करा : कोरोनाविरोधात अख्खे कुटुंबच मैदानात

जिल्हा बाल कल्याण समिती व जिल्हा महिला व बाल संरक्षण अधिकारी दररोज संस्थेच्या संपर्कात राहून मुलांचे संगोपन कसे चालू आहे याची चौकशी करतात. परंतु मुलांना रुग्णालयात ने आण करण्यातच मोठी अडचण असल्याचे सांगण्यात आले. 

जननी आशिष संस्था ही ठाणे ग्रामीण हद्दीत येते. त्यामुळे स्थानिक पोलिस ठाण्यातून आम्ही ई-पास मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो देण्यात आला नाही. शहरातील सर्व पोलिस ठाण्यातून आम्हाला परवानगी पत्र मिळणेही शक्य नाही. महिला बालविकास विभागाचे पत्र आमच्याकडे आहे. परंतु, त्यावर संस्थेच्या नावाचा उल्लेख नसल्याचे कारण दाखवत आमची अडवणूक केली जाते. किमान एक रिक्षाचालक व एक चारचाकी वाहन चालकास परवानगी देण्यात यावी. तसेच मुलांना फळे आणि भाज्यांचीही कमतरता जाणवत आहे. आम्हाला किमान काही सोयीसुविधा हव्या असून याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.
- वंदना बागवे-पाटील, उप संचालक, 
जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Barriers to the treatment of Orphaned children