बारवी धरण विस्थापितांचा नरकवास

मुरलीधर दळवी
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

मुरबाड तालुक्‍यातील बारवी धरणाची उंची वाढवून पाणीसाठा वाढवण्यासाठी तोंडली गावातील कुटुंबांचे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) गावठाण देऊन पुनर्वसन केले; मात्र तेथील परिस्थिती पाहिली तर हे पुनर्वसन आहे की नरकवास, असा प्रश्न पडतो. 

ठाणे : मुरबाड तालुक्‍यातील बारवी धरणाची उंची वाढवून पाणीसाठा वाढवण्यासाठी तोंडली गावातील कुटुंबांचे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) गावठाण देऊन पुनर्वसन केले; मात्र तेथील परिस्थिती पाहिली तर हे पुनर्वसन आहे की नरकवास, असा प्रश्न पडतो. 

टेपवाडी येथे प्लास्टिकच्या कापडाचा तंबू हे त्यांचे घर. त्यांना प्यायला पाण्याची सोय नाही. शौचालय नाही, महिलांना अंघोळीसाठी न्हाणीघर नाही. ओल आलेल्या जमिनीवर ताडपत्री टाकून त्यावरच बसायचे व शेजारील ओल्या जमिनीवर चूल पेटवून जेवण तयार करायचे. रात्री तेथेच झोपायचे. मोठ्या माणसांना कंटाळा येऊ नये म्हणून घरात टीव्ही आहेत. मीटर नसताना वीजपुरवठा केलेला आहे. ओल्या माळरानात गवत, चिखल तुडवत लहान मुले खेळतात. अशा परिस्थितीत सहा महिने ते साठ वर्षे वयाचे कातकरी बांधव दिवस ढकलत आहेत. 

पुनर्वसन करण्यासाठी दिलेल्या भूखंडावर व्यवस्थित भरणी न केल्याने तेथे पाणी तुंबले आहे. रस्त्याच्या बाजूला गटारे बांधण्यासाठी खड्डे खोदून ठेवले. मात्र, गटारांचा पत्ताच नाही. मुलांसाठी शाळेच्या खोल्या बांधल्या. त्यामध्ये जेवणाची खोलीच नसल्याने मुलांना शाळेत दुपारचे जेवणच मिळत नाही. या भीषण परिस्थितीने कातकरी बांधव मेटाकुटीला आले आहेत. रोजगार नसल्याने नुकसानभरपाई म्हणून मिळालेल्या रकमेतूनच कुटुंबाचा घरखर्च भागवला जातो. अशा परिस्थिती पुढील काळात काय होणार, हा मोठा प्रश्‍न आहे. 

----------------------------------------------------------------------------------

कातकरी जमात ही भारतामध्ये जलद गतीने नष्ट होत असलेली जमात आहे. त्यांचे जीवनमान वाढविण्यासाठी ठाणे जिल्ह्यात खास कातकरी उत्थान अभियान चालवले गेले. विशेष शिबिरे भरवून ते राहत असतील ते घर व जागा सरकारने त्यांच्या नावावर करून देण्याचे आदेश आहेत; मात्र तोंडली गावात स्वतःची घरे असलेले कातकरी बांधव आता जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. प्रशासन मात्र आम्ही त्यांचे पुनर्वसन केल्याचा डंका पिटते, ही खेदाची बाब आहे. 
- इंदवी तुळपुळे, 
श्रमिक मुक्ती संघटना कार्यकर्त्या 

आमची सात बिऱ्हाडे राहायला आली आहेत. पैसे उशिरा मिळाल्याने आता घराचे काम सुरू केले आहे. गावातील घरे तशीच राहिली आहेत. आता प्लास्टिकच्या झोपड्यात रहातो, तिथे काहीच सोय नाही. 
- कमल वाघ, 
विस्थापित, तोंडली 

आम्हाला अजून जागा मिळाली नाही. आम्ही दुसऱ्यांच्या जागेत राहतोय. होळीपासून पैसे द्यायला सुरुवात केली होती. आम्हाला उन्हाळ्यात जायला सांगितले; मात्र ना जागा दिली, ना वीज मीटर. 
- देविदास वाघ, 
विस्थापित, तोंडली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Barvi dam displacement getting hell