जहाजबांधणी, दुरुस्तीला लवकरच 'पायाभूत'चा दर्जा - मनोहर पर्रीकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

मुंबई - जहाजबांधणी आणि दुरुस्ती क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा देण्यात येणार आहे. तो मिळाल्यास नौदल गोद्यांना कर्ज मिळणे सोपे होईल व नौदलाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील, असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज येथे व्यक्त केले.

मुंबई - जहाजबांधणी आणि दुरुस्ती क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा देण्यात येणार आहे. तो मिळाल्यास नौदल गोद्यांना कर्ज मिळणे सोपे होईल व नौदलाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील, असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज येथे व्यक्त केले.

नौदलाच्या प्रोजेक्‍ट 15 (अ)मधील "चेन्नई' या विनाशिकेला आज पर्रीकर यांच्या हस्ते नौदल ताफ्यात समाविष्ट करून घेण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. माझगाव गोदीत बांधलेली "चेन्नई' ही अद्ययावत विनाशिका आहे. या विनाशिकेत संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. तिच्यामुळे नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे, असेही पर्रीकर यांनी सांगितले.

नौदलाला संहारक शक्ती देणारे अनेक प्रकल्प लवकरच मार्गी लागतील. वायुसेनेने "रुस्तम 2' या देशी बनावटीच्या मानवरहित विमानाच्या नुकत्याच यशस्वी चाचण्या केल्या. नौदलात हॅलिकॉप्टरची संख्या कमी आहे; मात्र नौदल ताफ्यात 15 आधुनिक हॅलिकॉप्टरचा समावेश करण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती पर्रीकर यांनी दिली.

भारतात अतिरेकी घुसवण्याच्या पाकिस्तानच्या कारवायांबाबत ते म्हणाले, की आपल्या लष्कराने केलेल्या "सर्जिकल स्ट्राइक'मुळे परिस्थितीत थोडीफार सुधारणा होत आहे. आपल्या लष्कराने युद्धबंदीचे उल्लंघन केलेले नाही. पाकिस्तानचा गोळीबार मात्र सुरूच आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेला जवान चंदू चव्हाणच्या सुटकेसाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: basic facility for shipping repairing