गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला लावलेले टाळे झाले गायब

मुरलीधर दळवी
सोमवार, 16 जुलै 2018

मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. ई .ए. हाश्मी यांच्या कार्यालयास शुक्रवारी पंचायत समितीचे सभापती, सदस्य व भाजप कार्यकर्त्यांनी ठोकलेले टाळे आज सोमवार (ता. 16) गायब झाल्याचे समोर आले.
 

मुरबाड (ठाणे) - मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. ई .ए. हाश्मी यांच्या कार्यालयास शुक्रवारी पंचायत समितीचे सभापती, सदस्य व भाजप कार्यकर्त्यांनी ठोकलेले टाळे आज सोमवार (ता. 16) गायब झाल्याचे समोर आले.

गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे लावण्याच्या घटनेचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यकर्ते सोमवारी पंचायत समितीच्या कार्यालया समोर भाजप सरकारचा पुतळा जाळणार होते परंतु, त्यांना पोलिसांनी पंचायत समितीच्या प्रवेश द्वारावर अडवून पोलीस ठाण्यात नेले व प्रतिबंधात्मक कारवाई करून दुपारी सोडून दिले. त्यामुळे पंचायत समितीच्या कार्यालयात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

गट विकास अधिकाऱ्यांना कामावर येऊ देणार नाही असा निर्धार केलेले भाजप पंचायत समिती सदस्य गट विकास अधिकारी कामावर न आल्याने तसेच माघारी गेले तर मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गट विकास अधिकाऱ्यांना त्वरित कामावर हजर करण्याची मागणी केली आहे.

गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयास टाळे ठोकण्याच्या भाजप कार्यकर्त्यांच्या कृतीचे पडसाद सोशल मीडियावर सुद्धा उमटत असून कार्यक्षम अधिकाऱ्याला पाठींबा देण्याचे आवाहन केले जात आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  सुभाष पवार यांनी टाळे लावून गोर गरीब जनतेची कामे अडवू नका सत्ता भाजपची आहे गट विकास अधिकाऱ्यांची बदली करण्याचे अधिकार सरकारला आहेत त्यामुळे कोणीही गट विकास अधिकारी आणा पण काम बंद करू नका असे आवाहन केले.

Web Title: BDO office murbad thane closed news