फटाक्यांच्या विक्रीबाबत दक्षता घ्या : उच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

गर्दीच्या आणि रहदारीच्या ठिकाणी फटाकेविक्री करु नये असे सक्त आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून बाजापेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. बच्चे कंपनी देखील फटाक्यासांठी नेहमीप्रमाणे उत्सुक असतानाच फटाके विक्रेत्यांना मात्र न्यायालयाने चांगलाच समज दिला आहे. गर्दीच्या आणि रहदारीच्या ठिकाणी फटाकेविक्री करु नये असे सक्त आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र तरीदेखील अनेक फटाकेविक्रेते या आदेशाचे पालन करत नाही आहेत. 

फटाके हा एक स्फोटक पदार्थ असल्याने तो त्वरीत पेट घेतो. दरम्यान फटाक्यांनी पेट घेऊन दुर्घटना घडल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या देखील आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी न्यायालयाने फटाके हे गर्दीच्या आणि रहदारीच्या ठिकाणी न विकण्याचे आदेश दिले होते. तसेच फटाके शहाराबाहेर मैदान किंवा मोकळ्या जागेत विकावे असेही न्यायलयाकडून सांगण्यात आले होते. यासाठी महापालिकेकडून देखील फटाकेविक्रेत्यांना जागा पुरविण्यात आली होती.

मात्र तरीदेखील काही विक्रेते हे रेल्वे स्टेशन आणि मुख्य बाजारपेठांमध्ये फटाके विकताना दिसून येतात. अशाप्रकारच्या स्टॅाल्समुळे गर्दीच्या ठिकाणी दुर्घटना होण्याची भिती निर्णाण झाली असून या विक्रेत्यांवर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be careful about selling firecrackers: High Court