सावधान! रात्र घरफोड्यांची आहे...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

नवी मुंबईतदेखील गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या कारवायांत वाढ झाली आहे. पोलिसांकडून या चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न होत असला, तरी त्या प्रमाणात हे गुन्हे उघडकीस आणण्यात; तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळविण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसून येत आहे.  

नवी मुंबई - एप्रिल-मे महिना म्हणजे चोरट्यांसाठी सुगीचा काळ. या दिवसात बहुतेक कुटुंबे आपल्या मूळ गावी अथवा बाहेरगावी मौजमजा करण्यासाठी जात असतात. नेमकी हीच संधी साधून चोरटे अशी घरे हेरून ती पूर्णपणे साफ करतात. नवी मुंबईतदेखील गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या कारवायांत वाढ झाली आहे. पोलिसांकडून या चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न होत असला, तरी त्या प्रमाणात हे गुन्हे उघडकीस आणण्यात; तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळविण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसून येत आहे.  

एप्रिल आणि मे महिन्यांत घरफोडीच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येते. घरफोड्या करणाऱ्या अनेक टोळ्या सुट्टीच्या काळात परराज्यांतून मुंबई, नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये तळ ठोकून असतात. हे यापूर्वीच्या कारवायांवरून दिसून आले आहे.  

मागील तीन वर्षांतील आकडेवारीच्या तुलनेत नवी मुंबईत यंदा उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत घरफोडीच्या गुन्ह्यांचा आकडा कमी असला, तरी हे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. गेल्या वर्षी २०१८ मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत १३७ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. यापैकी ७८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले; तर या वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत ११३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे; मात्र यापैकी फक्त ४१ गुन्हेच उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. 

मौल्यवान वस्तू बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात. संशयित व्यक्ती आढळल्यास त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त तुषार दोषी यांनी केले आहे.

परत मिळवलेला मुद्देमाल
सन २०१७ मध्ये घडलेल्या एकूण ४४९ घरफोडीच्या गुन्ह्यात १३ कोटी ६० हजार ७९५ रुपयांची मालमत्ता चोरीला गेली होती. त्यापैकी फक्त तीन कोटी १९ लाख २२ हजार ६५१ रुपयांचा मुद्देमाल परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे; तर २०१८ मध्ये दाखल असलेल्या एकूण ४६० घरफोडीच्या गुन्ह्यांत पाच कोटी ८९ लाख २० हजार ७६६ रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला होता. त्यापैकी फक्त एक कोटी ८२ लाख एक हजार ११४ रुपये किमतीचाच ऐवज पोलिसांना परत मिळविता आला आहे.  

पोलिसांचे नागरिकांना आवाहन  
रात्री झोपताना घराचे दरवाजे, खिडक्या, प्रवेशद्वार पूर्ण बंद करावे. सुरक्षा रक्षक नेमताना त्यांची संपूर्ण माहिती घ्यावी. शक्‍यतो विश्वासातील, परिचयातील व्यक्तींनाच सुरक्षा रक्षक म्हणून नेमावे. भाडेकरू ठेवतानाही तो पूर्वी कुठे राहत होता, त्याची सामाजिक पार्श्वभूमी याची माहिती घ्यावी. दागिने, मौल्यवान वस्तू बॅंकांच्या लॉकर्समध्ये ठेवाव्यात, अशा सूचना पोलिसांकडून प्रत्येक वर्षी नागरिकांना दिल्या जातात. मात्र नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करून बाहेरगावी निघून जातात. परिणामी चोरटे त्यांचे घर साफ करतात. चोरी होऊ नये यासाठी नागरिकांनीही आधी स्वतः काळजी घेणे, दक्ष राहणे व बाहेर जाताना त्याची माहिती पोलिसांना देणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

नागरिकांनी घरी नोकर ठेवताना त्याचे नाव, गाव, वय, राहण्याचा पत्ता, फोन नंबर, त्याचे मूळ राहण्याचे ठिकाण; तसेच कुटुंबीयांची माहिती सर्वप्रथम घ्यावी. त्याशिवाय नोकराला ओळखणाऱ्या दोघांची नावे, त्यांचा पत्ता व दूरध्वनी क्रमांकही घ्यावा. नोकरासमोर आपल्या संपत्तीचे प्रदर्शन टाळावे. कपाटाच्या चाव्या नोकराच्या हाती लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
- तुषार दोशी, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

Web Title: Be careful house robbery in mumbai

टॅग्स