खंबीर राहा, पक्ष तुमच्या पाठिशी आहे : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

सचिन अहिर यांनी शिवसेना प्रवेशाबाबत कोणत्याही प्रकारे कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नसल्याचा रागही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

मुंबई : सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे वरळी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली मरगळ दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शुक्रवार) परिसरातील सर्व कार्यकर्त्यांची भेट घेतली. खंबीर राहा, सर्व पक्ष तुमच्या पाठिशी उभा आहे, परिसरातील जनहिताची कार्ये सुरू ठेवा असा, असा संदेश पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. 

वरळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱयांनी शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांकडून परळी विधानसभा मतदारसंघातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच कार्यकर्त्यांनीही त्यांची गाऱ्हाणी पवार यांच्यापुढे मांडली. सचिन अहिर यांनी शिवसेना प्रवेशाबाबत कोणत्याही प्रकारे कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नसल्याचा रागही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्यात सचिन अहिर यांचे कट्टर समर्थक असलेले वरळी कोळीवाडा, बीडीडी चाळ, बावन्न चाळ येथील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी काही कार्यकर्त्यांना अश्रूही अनावर झाले. त्यांनी परिसरातील सर्व परिस्थिती शरद पवार यांच्या कानावर घातली. एवढ्या मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी आल्यामुळे पवार यांनीही आनंद व्यक्त करून सर्व पदाधिकाऱयांना धीर दिला. तसेच परिसरातील जनहिताचे कार्य असेच सुरू ठेवा, असा मोलाचा संदेशही यावेळी पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be strong party is with you says Sharad Pawar