दहा महिन्यांच्या बालिकेला पाळणाघरात मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

खारघर - दिवसभराचा कामाचा शीण उतरून, त्या माऊलीने येताना पाळणाघरातून सोबत आणलेल्या पोटच्या गोळ्याकडे पाहिले, तर तो अवघ्या 10 महिन्यांचा जीव लोळागोळा होऊन पडल्यासारखा वाटला. जिव्हारी घाव लागल्यासारखी ती माऊली त्याला घेऊन पाळणाघरात गेली आणि तिने जाब विचारला. पण पाळणाघर चालवणारे दाद देईनात. त्या माऊलीने रणचंडिकेचा अवतार धारण केला. तिने पोलिस ठाणे गाठले, तर तिथेही तिला उद्वेगजनक अनुभव आला. 

खारघर - दिवसभराचा कामाचा शीण उतरून, त्या माऊलीने येताना पाळणाघरातून सोबत आणलेल्या पोटच्या गोळ्याकडे पाहिले, तर तो अवघ्या 10 महिन्यांचा जीव लोळागोळा होऊन पडल्यासारखा वाटला. जिव्हारी घाव लागल्यासारखी ती माऊली त्याला घेऊन पाळणाघरात गेली आणि तिने जाब विचारला. पण पाळणाघर चालवणारे दाद देईनात. त्या माऊलीने रणचंडिकेचा अवतार धारण केला. तिने पोलिस ठाणे गाठले, तर तिथेही तिला उद्वेगजनक अनुभव आला. 

पाळणाघरातील आया अफसाना बशीर शेख हिने या बालिकेला अमानुष मारहाण केल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणामुळे उघड झाले आहे. खारघरमध्ये हे पौर्णिमा डे केअर सेंटर आहे. प्रियंका प्रवीण निकम ते चालवतात. त्यांच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोघींनाही पोलिसांनी अटक केली आहे. या बालिकेला आया चेंडूसारखे इकडेतिकडे फेकत असताना, तिचा गळा आवळून आसुरी आनंद मिळवत असताना बाजूलाच झोपलेली मुले जराही हालचाल करत नव्हती. त्यांना एखादे गुंगी आणणारे पेय पाजून आयाने निजवले असावे, असे चित्रीकरणात दिसते. 

सेक्‍टर 10 मधील रुचिता व रजत सिन्हा या दाम्पत्याला हा भयानक अनुभव आला. हे नोकरी करत असलेले दाम्पत्य जवळच्याच "पौर्णिमा डे केअर सेंटर'मध्ये आपल्या बालिकेला ठेवत असे. सोमवारी रुचिता या पाळणाघरात आल्या, तेव्हा तिची मुलगी बाजूला कोपऱ्यात निपचित पडून होती. तिला झोप आली असावी, असे वाटून त्यांनी तिला घरी नेले. तिला हाक मारून उठवण्याचा प्रयत्न केला. नंतर तिच्या डोक्‍याला इजा झाल्याचे दिसताच त्यांनी तिला रुग्णालयात नेले. तिला जखम कशी झाली, असे त्यांनी पाळणाघरात जाऊन प्रियंका यांना विचारले. तेव्हा आयाने पडल्यामुळे तिला जखम झाल्याचे सांगितले. रुचिता सिन्हा यांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण दाखवण्याची मागणी केली. त्यांनी टाळाटाळ करताच रुचिता यांनी पोलिस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी मुलीला आधी रुग्णालयात नेण्यास सांगितले आणि डॉक्‍टरांचा अहवाल मागितला, असे रुचिता यांनी सांगितले. 

पोलिसांनी तज्ज्ञाला बोलावून सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण पाहिले, तेव्हा अफसाना मुलीला आपटून मारत असल्याचे आणि तिचा गळा आवळत असल्याचे दिसले. तरीही पोलिसांना डॉक्‍टरांचा अहवाल कशाला हवा होता, असा रुचिता यांचा सवाल आहे. पोलिसांनी तक्रार मराठीत नोंदवली होती. मला मराठी येत नसल्याने मी त्यावर सही केली नाही. रात्री दीड-दोन वाजता ग्रामस्थ जमा झाल्यावर पाळणाघर चालवणाऱ्या प्रियंका यांना पोलिसांनी सोडून दिले. त्यांना अटक का केली नाही, असा सवाल रुचिता यांनी पत्रकारांशी बोलताना केला. प्रसिद्धिमाध्यमांनी या प्रकरणाला प्रसिद्धी दिल्यावर पोलिसांनी प्रियंका व अफसाना या दोघींना अटक केली, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: Beat ten-month child

टॅग्स