कळंबोलीत बीअरच्या बाटल्यांनी मारहाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

कळंबोली पोलिस ठाण्यात चाैघांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : मारामारीची तक्रार केल्याचा राग डोक्‍यात ठेवून तरुणाला बीयरच्या बाटल्या डोक्यात तसेच शरीरावर फोडून चौघांनी जबर मारहाण केल्याची घटना कळंबोलीत घडली. विश्‍वनाथ गणेश गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रोडपालीमधील गिरीराज रेस्टॉरंट अँड बारसमोर शनिवारी (ता.३) रात्री साडे अकराच्या सुमारास विश्‍वनाथ गायकवाड याच्यावर पोलिसांत तक्रार केल्याचा राग डोक्‍यात ठेवून सिद्धांत जगदीश गायकवाड, स्वप्नील जगदीश गायकवाड, संदेश जगदीश गायकवाड, तेजस भगवान चाफेकर (सर्व रा. रोडपाली) यांनी विश्वनाथ याच्या कपाळावर डोक्‍यावर , पोटावर, पाठीवर, डोळ्याजवळ बीयरच्या बाटल्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली.

तक्रारदार सिद्धार्थ गायकवाड याला दोन दिवसांपूर्वी जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी किरकोळ कारणावरून मारहाण केली होती. यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. याचा राग त्यांनी विश्‍वनाथवर काढला. कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पंकज महाजन तपास करीत आहेत. जखमी विश्‍वनाथवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beaten with bottles of beer