सट्टेबाजांचा कॉंग्रेसकडे कल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मुंबई - देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणून पाहिले जात आहे, त्यामुळे सट्टेबाजांचेही लक्ष या निवडणुकांच्या निकालाकडे लागले असून, त्यांचा कल कॉंग्रेसकडे झुकला आहे. सट्टेबाजांच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये कॉंग्रेस सत्ता स्थापन करणार असून, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये चुरशीची लढत आहे. या निवडणुकांवर तब्बल 40 हजार कोटी रुपयांचा सट्टा लागला आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या राज्यांमधील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दबदबा कायम राहणार, वाढणार अथवा घटणार याचे सूतोवाच या निवडणुकांतून मिळतील, असे सांगितले जाते. या पार्श्‍वभूमीवर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांना मतदार नाकारतील, राज्यात सत्ताधारी भाजप कॉंग्रेसच्या आसपासही पोचू शकणार नाही, असा सट्टेबाजांचा होरा आहे. मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे सरकार येईल, तर छत्तीसगडमध्ये भाजप अत्यंत कमी फरकाने विजयी होईल, असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे.

स्थानिक परिस्थिती ध्यानात घेऊन, राजकीय जाणकारांकडून माहिती मिळवून सट्टेबाज राजकीय पक्ष व नेत्यांचे भाव ठरवतात. विजयाची शक्‍यता अधिक असलेला पक्ष आणि नेत्यांना कमी; तर पराभवाची शक्‍यता अधिक असलेला पक्ष आणि नेत्यांना जास्त भाव देण्यात येतो. बदलत्या समीकरणांनुसार सट्ट्यांच्या भावातही चढ-उतार होतात.

Web Title: Beating Congress Politics