नवी मुंबईतील सुशोभित तलाव बनले धोबीघाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नवी मुंबई महापालिकेने तलाव व्हिजन अंतर्गत १८ तलावांचे सुशोभीकरण करताना गाळ काढणे, गॅब्रीयन भिंत, घाट, निर्माल्य कलश, स्वागत कमान यावर २० कोटींहून अधिक खर्च केला आहे. मात्र, त्यामुळे करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे तलाव देखभाल व सुरक्षेअभावी धोबीघाट झाले आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने तलाव व्हिजन अंतर्गत १८ तलावांचे सुशोभीकरण करताना गाळ काढणे, गॅब्रीयन भिंत, घाट, निर्माल्य कलश, स्वागत कमान यावर २० कोटींहून अधिक खर्च केला आहे. मात्र, देखभालीअभावी या तलावांचे विद्रूपीकरण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या तलावांमध्ये कपडे धुण्यास सक्त मनाई असतानाही, नागरिक या ठिकाणी कपडे धूत असल्याने तलावातील पाणी दूषित होत आहे. त्यामुळे करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे तलाव देखभाल व सुरक्षेअभावी धोबीघाट झाले आहेत.

ऐरोली नाका येथील तलावाच्या बाजूला बसवण्यात आलेल्या लोखंडी पाईपवर कपडे सुकण्यासाठी टाकण्यात येतात. या तलावांमधील प्रवेशद्वारावर कचरा साचला असून, पाण्यावर कचऱ्याचा तवंग दिसून येत आहे. तलावांचे प्रवेशद्वार तुटलेल्या अवस्थेत आहे. तलावाच्या बाजूने बसवलेले पदपथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केले आहेत. नागरिकांना बसण्यासाठी बसवण्यात आलेले बाकडेदेखील तुटलेल्या अवस्थेत आहेत. दिघा येथील तलावामध्ये कांरजे बसवण्यात आले आहेत. पण हे कारंजे केवळ दिखाव्यासाठी शिल्लक राहिले असून, पाण्यात धूळ खात पडलेले आहेत. रबाळेतील राजीव गांधी तलावाची देखील हीच अवस्था असून, या ठिकाणी बसण्यासाठी असलेले बाकही तुटलेल्या अवस्थेत आहे. तर रहिवाशांकडून कपडे धुण्यासाठी तलावाच्या पाण्यातील वापर करण्यात येतो. तर आग्रोळी तलावाच्या बाजूने असणाऱ्या पदपथ काही जुगारींचा अड्डा बनला आहे. कोपरखैरणे येथील तलावामध्ये देखील तलावाच्या बाजूने सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या ग्रिल्स तुटलेल्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी तलावाला सुरक्षारक्षक नसल्याने पाण्यामध्ये लहान मुले बुडण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. 

घाणीचे साम्राज्य
या तलावांमध्ये गणपती व देवी विर्सजनासाठी वेगळा कॉर्नर पीस काढण्यात आला आहे. त्यामध्ये गणपती किंवा देवी न बुडवता थेट चांगल्या पाण्यामध्येच मूर्ती बुडवल्या जातात. कचरा हा निर्माल्यकुंड किंवा कलशामध्ये न टाकता थेट पाण्यात टाकण्यात येत असल्यामुळे तलावांमध्ये कचरा दिसून येत आहे.
 
कारवाईला केराची टोपली
या तलावांच्या कठड्यावर सुकण्यासाठी टाकण्यात आलेले कपडे पालिकेकडून जप्त करून ते जाळून टाकण्यात येत आहेत. मात्र पालिकेकडून करण्यात येणाऱ्या कारवाईलादेखील झोपडपट्टीमधील रहिवाशांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील रहिवाशांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.

तलावामध्ये कपडे धुण्यासाठी साबण वापरण्यात येत असल्यामुळे तलवातील पाणी खराब होते. तलावातील हिरव्या शेवाळामुळे मच्छरांचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे पालिकेने कपडे धुण्यास, मूर्ती विसर्जन करण्यास परवानगी देऊ नये.
- आबा रणावरे, पर्यावरणप्रेमी.

तलावांच्या संवर्धनासाठी प्रशासनातर्फे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तलावांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडून पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यांवर अंकुश आणता येत नसेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beautiful lakes of Navi Mumbai becomes Dhobighat