पावणेतीन कोटी खड्ड्यात!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

या रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळूनही रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप वाघोशी, महागाव, भेरव, कवळे, कुंभारघर, चंदरगाव, ताडगाव येथील ग्रामस्थांनी केला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुधागड तालुक्‍यातील भेरव फाटा ते कुंभारघर यादरम्यान चार कि.मी. रस्त्याकरिता सुमारे दोन कोटी 78 लाख रुपयांचा प्रशासकीय निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळूनही रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप वाघोशी, महागाव, भेरव, कवळे, कुंभारघर, चंदरगाव, ताडगाव येथील ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेला कंत्राटदार आणि प्रशासन जबाबदार आहे. येत्या आठ दिवसांत रस्ता सुस्थितीत न आणल्यास सभोवतालच्या दहा गावांतील ग्रामस्थ भरपावसात रस्त्यावर बसून आंदोलन करतील, असा इशारा सर्व ग्रामस्थांनी दिला आहे.

रस्त्याचे काम कंत्राटदार मे. सिद्धिविनायक कन्स्ट्रक्‍शनमार्फत होत आहे. प्रशासकीय निधी उपलब्ध होऊनही कंत्राटदाराचा मनमानी कारभार, प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे रस्त्याची दुर्दशा झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत दगटगोटे, खडी, माती व चिखल रस्त्यावर असल्याने रस्त्याची वाट लागली आहे. रस्त्यावर चिखलाचा राडारोडा झाल्याने प्रवाशांसह वाहनचालकांची या मार्गावरून जीवघेणी कसरत सुरू आहे. ठिकठिकाणी तुटलेल्या मोऱ्या, मोऱ्यांचे धोकादायक काम, शेतात वाहून गेलेला रस्त्याचा भराव यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 

पिकांचे नुकसान 
रस्त्याच्या दुतर्फा केलेला मातीचा भराव पावसाळ्यात शेतात वाहून गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रस्त्याच्या कामात झालेल्या खोदकामादरम्यान विद्युत खांब धोकादायक झाले आहेत. रस्त्याच्या कामाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी उत्तमराव देशमुख यांनी केली आहे. या वेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक पवार, उपसरपंच उत्तमराव देशमुख, सुधागड शेतकरी समन्वय संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रमोद मोरे, नीलेश तळकर, शशिकांत देशमुख, नथुराम देशमुख, जगन्नाथ कुसाळकर, सुहास कुर्ले, बाबू देशमुख, अमित सागळे, नरेश गायकवाड, विशाल चिले, प्रतीक देशमुख, प्रदीप गायकवाड, लक्ष्मण चिले आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: berav to Kumbaharagar road cost of 2.17 lakh