बेस्टचे नियोजन ढेपाळले; नव्या बस येण्याची प्रतीक्षाच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील 400 बस नोव्हेंबरपर्यंत दाखल होतील, असा दावा प्रशासनाने केला होता. 

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील 400 बस नोव्हेंबरपर्यंत दाखल होतील, असा दावा प्रशासनाने केला होता. या महिन्यात 25 मिनीबस रस्त्यावर धावतील आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 149 बसगाड्या ताफ्यात दाखल होतील, असे स्पष्टीकरण बेस्ट प्रशासनाने मंगळवारी बेस्ट समितीत दिले. निश्‍चित कालावधी सांगण्यात न आल्यामुळे बेस्टच्या ताफ्यात नव्या बसगाड्या दाखल होण्याचे वेळापत्रक ढेपाळल्याचे दिसत आहे. 

स्वस्त आणि वातानुकूलित बसची सुविधा देताना प्रवाशांना जाणवणाऱ्या अडचणींवर बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा झाली. बेस्ट उपक्रमाने काही ठिकाणी "पॉईंट टू पॉईंट' सेवा सुरू केली असून, या बस विनाचालक आहेत. त्यामुळे मधल्या थांब्यांवर उतरणाऱ्या अनेक प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे निरीक्षण भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी नोंदवले. मोजके थांबे असलेल्या बस सेवेमुळे प्रवाशांचा गोंधळ उडत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. या सेवेचे योग्य नियोजन करून जादा बसगाड्या व फेऱ्या सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. 

बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील एसी बस नोव्हेंबरपर्यंत दाखल होण्याची केलेली घोषणा अजूनही प्रत्यक्षात आलेली नाही, अशी टीका महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. प्रवासी वाढले असले, तरी बस फेऱ्या पुरेशा नसल्याने रखडपट्टी होते, असे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे सुहास सामंत आणि भाजपचे श्रीकांत कवठणकर यांनीही प्रवाशांच्या गैरसोयीकडे लक्ष वेधले. 

बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील 100 पेक्षाही अधिक मिनीबस सेवांचे नियोजन केले असून, वेळापत्रक तयार केले आहे. ताफ्यातील बसची संख्या 15 हजारांपर्यंत नेल्यास तीन मिनिटाला एक बस चालवता येईल. 
- सुरेंद्रकुमार बागडे, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम 

web title : Best' plans abolished still waiting for the new bus to arrive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Best' plans abolished still waiting for the new bus to arrive