बेस्टच्या एसी बस भंगारात विकण्याचा प्रस्ताव रोखला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

मुंबई - बेस्टचे पांढरे हत्ती ठरलेल्या वातानुकूलीत बसेस कवडीमोल दरात भंगारात घालवण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीत सदस्यांनी रोखला. या बसेस खरोखर भंगारात काढण्याच्या स्थितीत आहेत की नाही? याची पडताळणी करा, त्यानंतर बोली लावा. मगच त्या भंगारात काढण्याचा प्रस्ताव आणा, अशी मागणी सदस्यांनी केली.

मुंबई - बेस्टचे पांढरे हत्ती ठरलेल्या वातानुकूलीत बसेस कवडीमोल दरात भंगारात घालवण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीत सदस्यांनी रोखला. या बसेस खरोखर भंगारात काढण्याच्या स्थितीत आहेत की नाही? याची पडताळणी करा, त्यानंतर बोली लावा. मगच त्या भंगारात काढण्याचा प्रस्ताव आणा, अशी मागणी सदस्यांनी केली.

बेस्टमध्ये 7 वर्षांपूर्वी 280 एसी बसेस सेवेत दाखल झाल्या. त्यापैकी आता फक्त 106 बसेस रस्त्यावर धावत आहेत. इतर सर्व बसेस डेपोमध्ये धूळ खात पडल्या आहेत. एसी बसमधून बेस्टला 4-5 वर्षांत 80 कोटी रुपये महसूल मिळाला तर, 400 कोटी खर्च झाला आहे. एसी बसमधून तोटा होत असल्यास या बसेस बंद कराव्यात, अशी मागणी बेस्ट समितीतील ज्येष्ठ सदस्य रवी राजा यांनी केली. "एसी बस चालविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्या भंगारात काढण्याचे षङ्‌यंत्र आखले जात आहे. त्या बस इतर ठिकाणी चालवता येऊ शकतात का? तसा विचार का केला जात नाही,' असा प्रश्‍न उपस्थित करीत या बस भंगारात काढण्यामागे कोण आहे? त्यांची नावे समिती समोर आणावीत, अशी मागणी केदार होंबाळकर यांनी केली. "वातानुकूलीत बस इतर ठिकाणी सुरू असताना त्या चालविण्यात अपयश का येत आहे,' असा सवाल कॉंग्रेसचे शिवाजी सिंग यांनी केला.

बस खरेदी करणारा दलाल कोण?
वातानुकूलीत बस चालविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका सर्वच सदस्यांनी बैठकीत ठेवला. वातानुकूलीत बस खरेदी करणारा कोणी दलाल निर्माण झाला आहे का, असा सवाल कॉंग्रेसचे संदेश कोंडविलकर यांनी केला. प्रशासनाने वातानुकूलीत बसच्या स्थितीबाबत माहिती द्यावी, मग लिलाव करावा. त्याला प्रतिसाद न मिळाल्यास बसेस भंगारात काढण्यास समितीची अनुमती घ्यावी, असा प्रस्ताव सादर केला जावा, असे मत सदस्यांनी मांडले. त्यामुळे अखेर हा प्रस्ताव रोखण्यात आला.

Web Title: Best AC bus scraping proposal rejected