ऐश्‍वर्या आणि अविनाश नारकर यांना 'सर्वोत्कृष्ट कलावंत' पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

मुंबई : अभिनेत्री ऐश्‍वर्या नारकर यांना साहित्य संघातर्फे सर्वोत्कृष्ट स्त्री-नाट्यकलावंत पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट गद्य नाट्य कलावंत पुरस्कारासाठी अविनाश नारकर यांची निवड झाली. अण्णा फणसे स्मृती पारितोषिक रत्नागिरीच्या "संत गोरा कुंभार' नाटकाला जाहीर झाले आहे. 

मुंबई : अभिनेत्री ऐश्‍वर्या नारकर यांना साहित्य संघातर्फे सर्वोत्कृष्ट स्त्री-नाट्यकलावंत पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट गद्य नाट्य कलावंत पुरस्कारासाठी अविनाश नारकर यांची निवड झाली. अण्णा फणसे स्मृती पारितोषिक रत्नागिरीच्या "संत गोरा कुंभार' नाटकाला जाहीर झाले आहे. 

"अंश' (प्रायोगिक रंगभूमी संस्था), प्राची सहस्रबुद्धे (सहायक अभिनेत्री), कविता टिकेकर (संगीत नाटक गायिका-अभिनेत्री), धवल भागवत (संगीत नाटक गायक-अभिनेता) यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. विनोदी नाट्यलेखनाचा पुरस्कार मकरंद देशपांडे यांना "एपिक गडबड' या नाटकासाठी, तर वादक-कलाकार पुरस्कार व्हायोलिनवादक राजेंद्र भावे यांना जाहीर झाला आहे. डॉ. मधुकर आष्टीकर स्मृती पारितोषिकासाठी कल्याण आर्या दुर्गा क्रिएशन्सचे सुनील जोशी यांची निवड करण्यात आली आहे. 

साहित्य संघाचा वर्धापनदिन कार्यक्रम 10 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता गिरगाव येथील मुख्य सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नाटककार वामन केंद्रे आणि अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक उपस्थित राहणार आहेत. अभिनेत्री दीप्ती भागवत सूत्रसंचालन करणार आहे. 

कार्यक्रमांचे रेलचेल
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीची सांगता म्हणून 8 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता "एक झुंज वाऱ्याशी' हे नाटक सादर होईल. त्यानंतर "सुंदर मी होणार' या नाटकाचे अभिवाचन केले जाईल. "साहित्य गौरव' पुरस्कार 9 नोव्हेंबरला प्रदान केले जाणार आहेत. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते दुपारी 4 वाजता "साहित्य' विशेषांकाचे प्रकाशन होईल. 10 नोव्हेंबरला "नाट्यगौरव' पुरस्कार वितरित झाल्यानंतर "सर्वात्मका सर्वेश्‍वरा' हा संगीत नाटकांतील भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला जाईल. हे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनाशुल्क आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Best Artist' award to Aishwarya and Avinash Narkar