आजपासून बेस्टच्या वेगळ्या रंगाच्या बस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

दोन मार्गांवर दोन दिवस विद्यार्थी जाणून घेणार प्रवाशांची मते
मुंबई - मुंबई शहराच्या वाहतूक सेवेतील 1874 पासूनची लाल रंगाची मक्तेदारी गुरुवारपासून (ता. 27) मोडीत निघणार आहे. दोन दिवस मुंबईच्या दोन मार्गांवर पांढऱ्या आणि पिवळ्या बस धावणार आहेत. मुंबईतील प्रवाशांना हा रंग किती आवडतो हे बसच्या रंगाला मिळणाऱ्या प्रतिसादातून स्पष्ट होईल.

दोन मार्गांवर दोन दिवस विद्यार्थी जाणून घेणार प्रवाशांची मते
मुंबई - मुंबई शहराच्या वाहतूक सेवेतील 1874 पासूनची लाल रंगाची मक्तेदारी गुरुवारपासून (ता. 27) मोडीत निघणार आहे. दोन दिवस मुंबईच्या दोन मार्गांवर पांढऱ्या आणि पिवळ्या बस धावणार आहेत. मुंबईतील प्रवाशांना हा रंग किती आवडतो हे बसच्या रंगाला मिळणाऱ्या प्रतिसादातून स्पष्ट होईल.

"बॉम्बे ट्राम वे' कंपनीने 1874 मध्ये घोड्याने ओढणाऱ्या ट्रामची सेवा शहरात सुरू केली होती. 9 मे 1874 रोजी अशी ट्राम कुलाबा ते पायधुनी दरम्यान धावली होती. या ट्रामचा रंग लाल होता. लंडन ट्रान्स्पोर्टच्या धर्तीवरच त्या वेळच्या बॉम्बेतही प्रवासासाठी लाल रंगाची सेवा सुरू करण्यात आली होती. मुळातच लंडनमधील कमी असणारा सूर्यप्रकाश पाहता गडद लाल रंगाची बस दिसावी या उद्देशाने तिथे बसना लाल रंग देण्यात आला होता. मुंबईत उठून दिसेल आणि तरुणांना बेस्टकडे आकर्षित करील, असा रंग बसना देण्याबाबत जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टसच्या विद्यार्थ्यांनी विचार सुरू केला. बेस्ट बसच्या लाल रंगाच्या इतिहासापासून बोधचिन्हापर्यंत विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. प्रायोगिक तत्त्वावर पांढरा आणि पिवळा रंग देऊन प्रवाशांची मते जाणून घेतली जातील. मुंबईत दोन मार्गांवर या बसेस गुरुवारपासून धावतील.

मुंबई सीएसटी ते गेट वे ऑफ इंडिया आणि वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानकापर्यंत या बस धावणार आहेत.

प्रवाशांना आवाहन
बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना या रंगांबाबत अभिप्राय कळवण्याचेही आवाहन केले आहे. बेस्ट उपक्रमाच्या probestundertaking@gmail.com या ईमेल आयडीवर हा अभिप्राय पाठवता येईल. या आधी बेस्ट वाहतूक आणि विद्युत पुरवठा विभागाचे बोधचिन्ह तयार करण्याचे कामही जे. जे. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी केले होते.

बेस्टमध्ये सर्वेक्षण
मुंबईत दोन मार्गांवर धावणाऱ्या बेस्ट बसमध्ये दोन दिवस जे. जे. महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्वेक्षण करणार आहेत. ते प्रवाशांना पाच प्रश्‍न विचारणार आहेत.

बेस्टचा लाल रंगाचा इतिहास
- 9 मे 1874 पासून घोडे जुंपलेली पहिली ट्राम सुरू
- 1907 मध्ये विजेवर धावणारी ट्राम
- 1926 मध्ये सिंगल डेकर पहिली बस
- 1937 पासून डबल डेकर बस

Web Title: best bus in different colour