फूट पडूनही बेस्टचा संप सुरूच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

शिवसेनेने पाठिंबा काढला; दगडफेकीत १० बसगाड्यांचे नुकसान
मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मंगळवारी (ता. ८) २७ आगारांतून एकही बस बाहेर पडली नाही. परंतु, शिवसेनेने माघार घेतल्यामुळे संपकऱ्यांमध्ये फूट पडली, तरी संप सुरूच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दगडफेकीत १० बसगाड्यांचे नुकसान झाले, एक चालक जखमी झाला; तसेच नागरिकांचे हालही झाले. संपात फूट पडल्यामुळे कामगार संघटनांमध्ये संघर्ष झडण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार संघटना कृती समितीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. सुमारे ३० हजार कामगार संपात सहभागी झाले आहेत. बेस्टच्या २७ आगारांतून मंगळवारी एकही बस बाहेर न पडल्यामुळे प्रवाशांना टॅक्‍सी, रिक्षा, खासगी वाहनांचा पर्याय शोधावा लागला. त्यामुळे खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांची अडवणूक केली. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासोबत झालेली चर्चा फिस्कटली असली, तरी बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी चर्चेसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत. दरम्यान, संप बुधवारी (ता. ९) सुरूच राहिल्यास ‘मेस्मा’खाली (महाराष्ट्र अत्यावश्‍यक सेवा परिरक्षण अधिनियम) कारवाई केली जाईल, असा इशारा बेस्ट प्रशासनाने दिला आहे. 

बेस्ट समिती अध्यक्षांनी तोडगा काढण्यासाठी कामगार संघटनांची संयुक्त बैठक बोलावली होती. बैठकीला जाण्यापूर्वीच कामगार संघटनांमधील वाद पुढे आले. या संपाला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने पाठिंबा दिला होता. परंतु, संपात सहभाग नसल्यामुळे शिवसेनेला बैठकीत सहभागी करून घेऊ नका, अशी भूमिका कृती समितीने घेतली. त्यानंतर शिवसेनेने आयुक्तांसोबत वेगळी बैठक घेतली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत महापालिका आयुक्तांसोबत दुपारी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. तोडगा न निघाल्यामुळे बुधवारीही संप सुरूच राहणार आहे. नितेश राणे यांच्या समर्थ कामगार संघटनेनेही संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. 

महापालिका आयुक्तांनी ‘आधी संप मागे घ्या; नंतर चर्चा केली जाईल’, असा पवित्रा घेतला. शिवसेनेने नरमाईची भूमिका घेऊन रात्री पुन्हा आयुक्तांसोबत बैठक घेतली.

शिवसेनेतही फुटीची शक्‍यता
शिवसेनाप्रणित कामगार संघटनेने संपातून माघार घेत १० हजार कामगार उद्यापासून कामावर हजर राहतील, असा दावा केला आहे; मात्र कामगार संपावर ठाम राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कामगार संघटनेत फूट पडू शकते. कामगार नेते दिवंगत शरद राव यांनी काही वर्षांपूर्वी पालिका कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी केला होता. त्या वेळी पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने नंतर माघार घेतली होती.

बेस्ट उपक्रमाची तूट - ७६९ कोटी
मंगळवारचे नुकसान - ०३ कोटी
बेस्टच्या बस - ३२०० आगारातच

Web Title: Best Bus Strike