लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत संप सुरूच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

मुंबई - मागण्यांबाबत लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार बेस्ट कामगारांच्या संयुक्त कृती समितीने मंगळवारी (ता. 15) वडाळा आगारात घेतलेल्या मेळाव्यात व्यक्त केला. त्यामुळे बेस्टचा संप बुधवारीही (ता. 16) सुरूच राहणार आहे.

मुंबई - मागण्यांबाबत लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार बेस्ट कामगारांच्या संयुक्त कृती समितीने मंगळवारी (ता. 15) वडाळा आगारात घेतलेल्या मेळाव्यात व्यक्त केला. त्यामुळे बेस्टचा संप बुधवारीही (ता. 16) सुरूच राहणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या प्रशासनाने उच्च न्यायालयात दिलेल्या प्रस्तावावर बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीच्या मेळाव्यात टीका करण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावामागे कामगारकपात आणि बेस्टच्या खासगीकरणाचा छुपा डाव आहे, असा आरोप संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी केला. बेस्ट प्रशासनाचा प्रस्ताव म्हणजे कामगारांसाठी एकप्रकारे "डेथ वॉरंट' आहे. त्याबाबत आमच्या भावना बुधवारी न्यायालयात मांडणार आहोत, असे राव यांनी सांगितले.

उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालात बेस्ट अर्थसंकल्प महापालिका अर्थसंकल्पात विलीन करण्याचा उल्लेख नाही. संप मागे घेण्याबाबत न्यायालयाने सूचना केली असली, तरी सर्व मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेतली जाणार नाही, असे राव म्हणाले. न्यायालयाने आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत संप मागे घेणार नाही, असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला. या मेळाव्यात बेस्ट कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिवसेनेवर टीकास्त्र
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बेस्ट कामगार आणि बेस्टला संपवायला निघाले आहेत. कामगार आठ दिवसांपासून संपावर असताना, "बेस्ट कामगारांना काहीही देऊ नका', असे ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले, असा आरोप शशांक राव यांनी केला. बेमुदत संपाच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने माघार घेतली. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनाप्रणीत संघटनेला माघार घेण्याचा आदेश देण्यात आला, असेही ते म्हणाले. घर आणि नोकरी टिकवायची असल्यास संपात सहभागी व्हा; नंतर कोणत्याही पक्षाचे झेंडे घ्या, असे आवाहनही त्यांनी कामगारांना केले.

Web Title: Best Bus Strike