'बेस्ट' रंगासाठी जनमत चाचणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई - जे. जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बेस्टच्या बसेसला दिलेल्या नव्या "लुक'बाबत मुंबईकरांकडून अभिप्राय घेतला जाणार आहे. या बसेसच्या रंगनिश्‍चितीच्या निमित्ताने सर्वेक्षण घेण्यात येईल.

मुंबई - जे. जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बेस्टच्या बसेसला दिलेल्या नव्या "लुक'बाबत मुंबईकरांकडून अभिप्राय घेतला जाणार आहे. या बसेसच्या रंगनिश्‍चितीच्या निमित्ताने सर्वेक्षण घेण्यात येईल.

त्यानंतर सर्वेक्षण अहवाल हा बेस्ट व्यवस्थापनाकडे सादर केला जाईल. मुंबईच्या "स्काईलाईन'ला शोभणारा असा पांढरा आणि पिवळा रंग बेस्ट बसेससाठी प्रायोगिक स्वरूपावर देण्यात आला आहे. बेस्ट व्यवस्थापन, प्रवासी आणि बेस्ट समितीच्या संमतीनंतरच या रंगावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.

प्रवासी या रंगाबाबत काय प्रतिसाद देतात, या आधारावर रंगनिश्‍चिती होईल. बेस्टचा नवा लोगोही यानिमित्ताने मुंबईकर प्रवाशांना पाहता येईल. विद्युत आणि परिवहन अशा दोन्ही उपक्रमांची सांगड घालणारा असा हा लोगो आहे. मुंबईतली तरुण पिढी बेस्टकडे आकर्षित व्हावी, या उद्देशाने पांढरा आणि पिवळा रंग सध्या दोन बसेसना देण्यात आला आहे. बेस्टकडे तरुण पिढीचा प्रवास करण्यासाठी कल वाढावा हा त्यामागील उद्देश आहे. आतापर्यंत वर्षानुवर्षे लाल रंगाच्या बसेस बेस्टकडून बांधून घेण्यात येत होत्या, पण पहिल्यांदाच पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या बसेसचा प्रयोग होणार आहे. याआधीचा बेस्ट उपक्रमाचा लोगोही जे. जे. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी तयार केला होता. या बसेस कोणत्या मार्गावर धावतील हे अजून निश्‍चित झालेले नाही.

जनमत चाचणी होणार
सर्वेक्षणाच्या निमित्ताने जे. जे. महाविद्यालयाचे विद्यार्थी बसेसला देण्यासाठीच्या रंगासाठीची जनमत चाचणीच एक प्रकारे घेणार आहेत. चाचणीतून येणारे निष्कर्ष हे बेस्ट व्यवस्थापनाकडे अहवालाच्या रूपात मांडण्यात येतील.

Web Title: best colour public test