बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत पगार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

मुंबई : बेस्टच्या 44 हजार कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार मंगळवार आणि बुधवारी दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला आहे. बेस्टच्या आर्थिक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आठवडाभरात कृती आराखडाही तयार करण्यात येणार आहे. हा आराखडा सादर झाल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीतून आर्थिक मदत देण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. 

बेस्टला आतापर्यंत 590 कोटींचा तोटा झाला आहे. त्यामुळे 10 मार्चला कर्मचाऱ्यांना पगार देता आला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या वेळी 44 हजार कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी 33 हजार आणि बुधवारी 11 हजार कर्मचाऱ्यांना पगार देण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना आणि दुसऱ्या टप्प्यात अधिकाऱ्यांना पगार मिळेल. बेस्टच्या तिजोरीतून ही व्यवस्था करण्यात येणार आहे. या बैठकीला महापालिका आयुक्त अजोय मेहता, बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील उपस्थित होते. 

बेस्टला तोट्यातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी सात दिवसांत पालिकेच्या गटनेत्यांपुढे कृती आराखडा सादर करण्यात येणार आहे. या कृती आराखड्यात बेस्टने अनुदानाची मागणी केल्यास पालिका अनुदान देण्याची शक्‍यता आहे. बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सांगितले. 

अर्थसंकल्प एकत्र मांडणार 
ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी बेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्र मांडण्याचे आश्‍वासन शिवसेनेने दिले आहे. त्यामुळे बेस्टला सक्षम करणे अधिक सोपे होईल. हे अर्थसंकल्प एकत्र करण्यावर भर देण्यात येईल, असेही जाधव यांनी सांगितले. प्रशासनानेही बेस्टला आर्थिक मदत करण्याबाबत विचार करण्याचे आश्‍वासन या बैठकीत दिले आहे.

Web Title: BEST employees to get salary in two installments