पगार न मिळाल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांत असंतोष 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

मुंबई - बेस्टमधील 42 हजार कामगार-कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार अजूनही मिळालेला नाही. कर्जबाजारी बेस्टला वित्त संस्थांनी कर्ज देण्यास नकार दिल्यामुळे मे संपत आला तरी अद्याप पगार देणे शक्‍य झालेले नाही. 

मुंबई - बेस्टमधील 42 हजार कामगार-कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार अजूनही मिळालेला नाही. कर्जबाजारी बेस्टला वित्त संस्थांनी कर्ज देण्यास नकार दिल्यामुळे मे संपत आला तरी अद्याप पगार देणे शक्‍य झालेले नाही. 

बेस्ट प्रचंड तोट्यात असल्याने दर महिन्याच्या पहिल्या तारखेला होणारा पगार तीन-चार महिन्यांपासून 10 तारखेपर्यंत मिळू लागला. आता महिन्यातले 20 दिवस उलटले तरी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. बेस्ट प्रशासनाला पगारापोटी दर महिन्याला 160 कोटींचा खर्च करावा लागतो. अनेक महिन्यांपासून बेस्ट कर्ज काढून कर्मचाऱ्यांना पगार देत होती. आता वित्तसंस्था बेस्टला तारण न ठेवता कर्ज देण्यास नकार देत आहेत. काही संस्था कर्ज देण्यासाठी मालमत्ता तारण ठेवण्यास सांगत आहेत. कर्जाचा मार्ग बंद झाल्याने बेस्ट प्रशासनाची कोंडी झाली आहे. पगार मिळत नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. 

बेस्टने महापालिकेकडे दीड हजार कोटींच्या मदतीची मागणी केली आहे. दोन महिन्यांपासून याबाबत पालिका प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप मदत मिळालेली नाही. 

आज पगार जमा होणार 
बेस्टच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत शनिवारी (ता. 20) पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल, असे बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सांगितले. 

बस खरेदीसाठी 100 कोटींचे अनुदान 
बेस्टला बॅटरीवर चालणाऱ्या आणि साध्या बसच्या खरेदीसाठी पालिकेने 100 कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट 303 बस खरेदी करणार असून त्यातील काही बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यासाठी 153 कोटींचा खर्च येणार असून त्यातील 100 कोटी अनुदानाच्या स्वरुपात देण्यात येतील. बेस्टला हे 100 कोटींचे अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.

Web Title: Best staff dissatisfaction