बेस्ट कामगारांचा पगार पुन्हा लांबणीवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पगार वेळेवर मिळत नसल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. पुढील तीन महिन्यांचे कामगारांचे पगार 20 एप्रिलच्या आत देण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई - पगार वेळेवर मिळत नसल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. पुढील तीन महिन्यांचे कामगारांचे पगार 20 एप्रिलच्या आत देण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन बेस्ट प्रशासन कसे करणार, असा पेच निर्माण झाला आहे. 

बेस्ट आर्थिक संकटात असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देता आलेले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, घराचे हप्ते, मुलांची लग्नकार्ये आदींसाठी अडचणी येत आहेत. कामगारांनी पगार वेळेवर मिळावा म्हणून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. संतप्त कर्मचाऱ्यांनी वडाळा आगाराजवळ निदर्शने करून संताप व्यक्त केला. कर्मचाऱ्यांनी आपली आर्थिक अडचण मुंबईकरांपुढे आंदोलनाच्या माध्यमातूनही मांडली. सध्या पगार वेळेवर मिळेल की नाही, अशी विवंचना कामगारांना सतावत आहे. 

औद्योगिक न्यायालयाने फेब्रुवारीचा पगार 30 मार्चच्या आत देण्याचे आदेश बेस्ट प्रशासनाला दिले होते. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचा पगार आता 20 तारखेपर्यंत द्यावा, असे आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे फेब्रुवारीचा पगार 26 मार्च रोजी झाला. 

पैशांची जमवाजमव 
बेस्ट कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार नेते शशांक राव यांनी जानेवारीमध्ये नऊ दिवस संप केला. त्या नऊ दिवसांचा पगार प्रशासनाने कापला. त्यापोटी 58 कोटी रुपयांची आणि इतर मार्गाने बेस्ट प्रशासनाने कामगारांच्या पगाराची जुळवाजुळव केल्याची समजते. आर्थिक वर्षअखेर असल्याने पैशांची जुळवाजुळव करणे प्रशासनाला अडचणी झाले होते. आता पुढच्या महिन्यासाठी पगाराची तजवीज करणे बेस्टसाठी कसोटी ठरणार आहे. 

पगारासाठी एकजूट 
बेस्ट कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीचा पगार 30 मार्चला आणि त्यानंतर पुढील तीन महिन्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेस दिला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बेस्टचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडल्याने कर्मचाऱ्यांना पगार देणे कठीण झाले आहे. बेस्टच्या निर्णयाने आर्थिक समस्यांमध्ये वाढ झाल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन बेस्ट संयुक्त कर्मचारी कृती समितीच्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेत देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्या मागणीसाठी कर्मचारी एकवटले आहेत. समितीच्या वतीने कामगार नेते शशांक राव यांनी बेस्ट प्रशासनावर घणाघाती टीका केली. बेस्टला कंत्राटदारांना रक्कम देताना अडचणी येत नाहीत; पण कर्मचाऱ्यांना पगार देताना हात आखडता घेतला जातो, असा सवाल त्यांनी केला आहे.

Web Title: Best workers pay again postponed