लसीकरणाच्या नोंदणीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून सावधान !

अनिश पाटील
Sunday, 17 January 2021

सायबर चोरट्यांनी नागरिकांना कोरोना लसीकरणाच्या नोंदणी करण्याच्या  नावाखाली लुटण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई:  देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र त्या आधीच सायबर चोरट्यांनी नागरिकांना कोरोना लसीकरणाच्या नोंदणी करण्याच्या  नावाखाली लुटण्यास सुरुवात केली आहे. सायबर चोरट्यांकडून अनेकांना फोन करून त्यांची माहिती घेऊन त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे उघड झाले आहे. अशा भामट्यांपासून सावधान राहण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.

राज्यासह देशात कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचा-यांना ही लस देण्यात येणार आहे. इतर कुणालाही ही लस घेता येणार नाही.  त्याचबरोबर ज्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यांच्या नावांच्या यादी सरकारने या आधीच तयार केल्या आहेत, असे असताना सायबर चोरट्यांनी अनेकांना फोन करून  मोबाईलवर संदेश पाठवून  लसीकरणासाठी नोंदणी करत असल्याचे सांगत आहेत. यावर विश्वास ठेवू नका. ही निव्वळ फसवणूक आहे, असे आवाहन स्वत: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे केले आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लसीकरणाची मोहीम केंद्रीय यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेमार्फत राबविली जात आहे. अशात काही सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करून या लसीची नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिनकोड आणि इतर वैयक्तिक माहिती विचारत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, तसेच आपली कोणतीही माहिती सार्वजनिक करू नये, असेही  गृहमंत्री  देशमुख यांनी ट्विट केले आहे. अशा प्रकारच्या फसव्या फोन कॉल्सची नजीकच्या पोलिस ठाण्यात आणि सायबर विभागात तक्रार करण्यास देशमुख यांनी सांगितले आहे.

हेही वाचा- TRP Case: बीएआरसीचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांची प्रकृती गंभीर

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Beware fraudsters name vaccination registration anil deshmukh Appeal


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware fraudsters name vaccination registration anil deshmukh Appeal