महापुरुषांवरील वादग्रस्त विधानांप्रकरणी हायकोर्टाचा दिलासा! कोश्यारी म्हणाले...: Bhagat Singh Koshyari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari

Bhagat Singh Koshyari: महापुरुषांवरील वादग्रस्त विधानांप्रकरणी हायकोर्टाचा दिलासा! कोश्यारी म्हणाले...

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह फुले दाम्पत्यांवर केलेल्या कथीत वादग्रस्त विधानाप्रकरणी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला आहे. कोश्यारींचं विधान इतिहसाचं विश्लेषण आणि त्यावरुन मिळणारा धडा असल्याचं सांगत त्यांनी कुठला गुन्हा केलेला नाही, असा निर्णय दिला. तसेच याबाबतची रिट याचिका फेटाळून लावली. हायकोर्टाच्या या निर्णयावर कोश्यारींनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझ्याशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं. (Bhagat Singh Koshyari first comment on Mumbai HC decision on his statement)

कोश्यारी म्हणाले, हायकोर्टानं जो निर्णय दिला आहे त्याचं मी स्वागत करतो. दुसरी गोष्ट माझ्या वक्तव्याचं राजकीय भांडवलं बनवलं गेलं. महान अशा प्रदेशाचा मी राज्यपाल राहिलो पण तिथेच मला व्हिलन ठरवलं गोलं याचं मला दुःख वाटतं. महाराष्ट्रातली जनता श्रेष्ठ आहे, माझ्या विधानांचा अर्थ योग्य प्रकारे घेण्याऐवजी त्याला वादाचा मुद्दा बनवलं गेलं. त्याचा मला कुठेतरी त्रास झाला. यामुळं माझ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलच्या सन्मानात कमी होणार नाही. महाराष्ट्रात काही राजकारण्यांना असं वाटतं होतं की, गोबेल्सचं तंत्राप्रमाणं शंभर खोटं बोलल्यानंतर ते खरं होऊन जाईल, असं त्यांना वाटत होतं.

हायकोर्टानं माझं विधान योग्य दृष्टीनं पाहिलं, त्यासाठी मी त्यांचं धन्यवाद देतो. मला वाटतं की महाराष्ट्राची जनता सर्वकाही जाणते, राजकीय कारणानं काही लोकांनी याला वादाचा मुद्दा बनवलं, पण मला दुःख याचंही वाटतं की मीडियानं देखील माझं विधान वारंवार वादग्रस्त असल्याचं दाखवलं. पण कोर्टाच्या या निर्णयामुळं भविष्यात जर राजकीय लोक अशा प्रकारच्या गोष्टींवर वाद निर्माण केला तर त्यावर मीडियानं योग्य प्रकारे दखल घ्यावी. तर त्यावरुन वाद निर्माण होणार नाही, त्यासाठी कोणाला कोर्टात जाण्याची गरजही पडणार नाही.

राजकीय षडयंत्र होतं का?

राजकीय कारणानं लोक बोलतात, ते आपल्याला कळतंही पण आपला मीडिया स्वतंत्र्य आहे. मीडियानं कायम मला वादग्रस्त राज्यपाल हा शब्द वापरला. माझ्या पद सोडण्याचा आणि या हायकोर्टाच्या सध्याच्या निर्णयाचा काहीही संबंध नाही. त्यामुळं हायकोर्टाच्या हा निर्णय आधी आला असता तरी मी राज्यपालपद सोडणार असल्याचं निश्चित केलं होतं, असंही कोश्यारी यांनी म्हटलं आहे.