सर्वोदयाचा 'सूर्यास्त'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 जून 2018

मुंबई - राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या आकस्मिक व खळबळजनक आत्महत्येने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्र अस्वस्थ झाले आहे. राजकारणात दैनंदिन संघर्षाचा ताण घेऊन जगणाऱ्या नेत्यांना भय्यू महाराज एक आधार वाटत होते. राजकीय व सामाजिक समस्यांवर नम्र व सहजतेने भय्यू महाराज तोडगा काढण्यात माहीर असल्याने सर्वच पक्षांचे दिग्गज नेते भय्यू महाराज यांचे अनुयायी होते. दिवंगत विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, हर्षवर्धन पाटील, सुनील तटकरे यांच्यासह उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचे भय्यू महाराज निकटचे अध्यात्मिक व राजकीय सल्लागार म्हणूनच संबंध होते.

देखणं रूप, रूबाबदार व्यक्‍तिमत्त्व व शालिनता व सहजता हे भय्यू महाराज यांचे वैशिष्ट्य होते. कर्मकांडावर त्यांचा फारसा विश्‍वास नव्हता. पण, हिंदू परंपरा व रीतिरीवाज याबाबत ते आग्रही असत. इंदोरमध्ये सर्वोदय आश्रमाची स्थापना त्यांनी केली. पण, त्याच्या सामाजिक कार्याची कर्मभूमी महाराष्ट्रातच वाढवली. शेती, माती व संस्कृती या त्रिसूत्रीवर त्यांचे जीवनकार्य बहरत होत. युवा राष्ट्रसंत म्हणून 2004 मध्ये त्यांना ओळख मिळाली. 1996 ते 2004 या काळात भय्यू महाराज यांनी आत्मिक शांतीसाठी अधात्मिक जीवनावर लक्ष केंद्रित केले. उच्चविद्याविभूषित, देशमुख घराण्यातील असल्याने महाराज होऊन सन्यस्थ व वैरागी जीवन जगणं तसे अवघड होते.

त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर त्यांच्या आईचा प्रभाव मोठा होता. आई हाच जीवनाचा खरा गुरू यावर त्यांची श्रद्धा होती. महाराष्ट्रात त्यांनी अध्यात्मिक व सामाजिक कार्य सुरू केल्यानंतर गावोगावी त्यांचे तरुण अनुयायी वाढले. शेतकरी आत्महत्याने महाराष्ट्र पोखरत असताना त्यांनी मानसशास्त्राला अधात्माची जोड देत शेतकऱ्यांचे मतपरिवर्तन करण्यास प्राधान्य दिले. केवळ दैववादाने प्रश्‍न सुटणार नाहीत, तर त्यासाठी प्रत्येक कार्य उभारणं गरजेचं असल्याचे त्यांनी जाणले होते. त्यातूनच सर्वोदय संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेती, शिक्षण व अध्यात्म याची सांगड घालत राष्ट्रभक्‍त समाजाची उभारणी करण्यास महत्त्व दिले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व भय्यू महाराजांचे जिव्हाळ्याचे नाते होते. उद्धव ठाकरे व राज यांच्यात समेट घडवण्यासाठी भय्यू महाराज यांनी सतत प्रयत्न केले. कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, शेकाप या पक्षातील सर्वच दिग्गज नेते भय्यू महाराज यांचे अनुयायीच होते. सर्व पक्षांत संबंध असताना त्यांनी कधीही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचारधारेला जाहीर समर्थन केले नाही.

भय्यूजी महाराज यांच्या आकस्मिक निधनाने सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. भय्यूजी महाराज यांच्या आध्यात्मिक विचारधारेचे अधिष्ठान लोकसेवा हेच होते. त्यांनी सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून समाजहितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा वंचित आणि उपेक्षित समाजघटकांना मोठा लाभ झाला आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

भय्यूजी महाराज यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मिक क्षेत्रातील महाराष्ट्राचा वारसा हरपला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व कायम हसतमुख, उत्साही आणि ऊर्जा प्रदान करणारे होते. त्यामुळे त्यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे. भय्यूजी महाराज यांचे अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे काम होते. निराशेवर मात करणारी नवी उमेद जागवण्याची अचाट क्षमता त्यांच्याकडे होती.
- विखे पाटील, विरोधी पक्षनेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhaiyyuji maharaj death