Bhandarhospitalfire | शॉर्टसर्किटमुळे लागली आग; अग्निशमन यंत्रणेचा अभावाने घडली दूर्घटना

मिलिंद तांबे
Thursday, 14 January 2021

भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. रुग्णालयात अग्निशमन यंत्रणाच अस्तित्वात नसल्याचेही अहवालात नोंदवण्यात आले आहे. 

मुंबई  : भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. रुग्णालयात अग्निशमन यंत्रणाच अस्तित्वात नसल्याचेही अहवालात नोंदवण्यात आले आहे. 

भंडारा आग प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आग प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलातील प्रभात रहांगदळे, अनिल परब आणि अभय चौधरी या अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असून नागपूर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने भंडाऱ्यात जाऊन चौकशी सुरू केली आहे. 

आगीचे नेमके कारण, तेथील अग्निप्रतिबंधक यंत्रणा, तसेच त्यापुढील उपाययोजना यावर ही समिती काम करत आहे. ही समिती तेथील रुग्णालयांना भेट देऊन तेथील अग्निप्रातिबंधात्मक व्यवस्थेचीही पाहणी करणार आहे. त्यानंतर साधारणत: एका महिन्याच्या आत समितीचे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार आपला निष्कर्ष अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 
दरम्यान, दोन दिवसांच्या तपासानंतर ही आग शॉर्टसर्किटमुळेच लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष या समितीने नोंदवला असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, रुग्णालयात आग विझवण्यासाठी आवश्‍यक असणारे स्प्रिंकर्स आणि हायड्रन्ट अस्तित्वात नसल्याची माहितीही समोर आली आहे. आग लागली त्या वेळी स्थानिक अग्निशमन दलाचे पथक वेळेत पोहोचले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

 

विदर्भातील सहा जिल्ह्यांचा आढावा 
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांतील अग्निशमन यंत्रणांचा आढावा समिती घेणार आहेत. मुंबई अग्निशमन यंत्रणेच्या धर्तीवर तेथील यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच, या जिल्ह्यांतील सर्व रुग्णालयांतील अग्नी प्रतिबंधात्मक यंत्रणेचा आढावाही घेण्यात येणार आहे. त्यात कोणते बदल आवश्‍यक आहेत किंवा मुंबईच्या धर्तीवर यंत्रणा उभी करणे शक्‍य आहे का, याचा आराखडाही समिती देणार असल्याची माहिती आहे. 

 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई अग्निशमन दलावर विश्वास 
आग प्रकरणाचा तपास करण्यासाठी प्रथमच मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे. केवळ आग प्रकरणच नाही, तर संपूर्ण पूर्व विदर्भातील जिल्ह्यांतील आग प्रतिबंधात्मक यंत्रणेचा आढावादेखील हे अधिकारी घेणार आहेत. त्यामुळे मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यपद्धतीची चुकून पुन्हा एकदा सर्वांना दिसणार आहे. 

समितीने काढलेले महत्त्वाचे निष्कर्ष 
- आग शॉर्टसर्किटमुळेच लागली 
- स्थानिक अग्निशमन दलाचे पथक वेळेत पोहोचले 
- रुग्णालय इमारतीला "फायर एनओसी' नव्हती 
- आग प्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध नव्हती 
- रुग्णालयात स्प्रिंकर्स तसेच हायड्रन्टची व्यवस्था नव्हती 
- मॉक ड्रिल होत नव्हते 
- रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण दिलेले नाही. 
 

Bhandarhospitalfire Fire caused by short circuit The accident happened due to lack of fire fighting system

--------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandarhospitalfire Fire caused by short circuit The accident happened due to lack of fire fighting system