भय्यांविरोधात कोळी महिला आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

भांडुप - एकीकडे मराठी माणसाच्या जीवावर जिंकून यायचे आणि त्यांच्याच पोटावर लाथ मारायची, हीच शिवसेनेची खरी खेळी आहे. महापालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेने शहरातील बेकायदा मासेविक्रेत्यांवर बंदी न घातल्यास आम्ही आत्महत्या करू आणि याला जबाबदार शिवसेना असेल, असा जळजळीत इशारा मुंबईतील कोळी महिलांनी दिला.

भांडुप - एकीकडे मराठी माणसाच्या जीवावर जिंकून यायचे आणि त्यांच्याच पोटावर लाथ मारायची, हीच शिवसेनेची खरी खेळी आहे. महापालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेने शहरातील बेकायदा मासेविक्रेत्यांवर बंदी न घातल्यास आम्ही आत्महत्या करू आणि याला जबाबदार शिवसेना असेल, असा जळजळीत इशारा मुंबईतील कोळी महिलांनी दिला.

दादरमधील खांडके बिल्डिंग परिसरात शिवसेनेकडून बुधवारपासून (ता. 20) टेम्पो आणि भय्या फेरीवाल्यांकडून स्वस्त दरात मासे विक्री करण्यात येत आहे. यामुळे दादर-माहीम परिसरात वर्षानुवर्ष मासेविक्री करणाऱ्या कोळी महिलांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. एका दिवसांत संपणारी मासळी तीन दिवस विकली जात नसल्याने कोळी महिलांनाच संताप अनावर झाला. टेम्पो लावून आणि डोक्‍यावर पाटी घेऊन मासे विकणाऱ्या भय्या विक्रेत्यांचा सुळसुळाट अचानक वाढल्याने कोळी महिलांचे ग्राहक कमी झाले आहेत. शिवाय शिळा आणि महाग माल ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रकारही वाढला आहे. कोळी महिलांनी याविषयीची तक्रार मनसेच्या विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्याकडे केल्यावर त्यांनी शुक्रवारी (ता. 22) पालिकेच्या जी/एन विभाग कार्यालयावर कोळी महिलांसह मोर्चा काढत कारवाईसाठी आयुक्तांना निवेदन दिले.

मुंबई महापालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेला मराठी माणसांची फक्त मतांपुरतीच आठवण होते. मासेविक्रीचे बेकायदा परवाना देऊन शिवसेना कोळी महिलांच्या पारंपरिक व्यवसायावर राजरोसपणे डल्ला मारत आहे. या प्रकारावर शिवसेनेचा जाहीर विरोध असून भय्या मासेविक्रेत्यांविरोधात आम्ही मनसे पद्धतीने उत्तर देऊ.
- यशवंत किल्लेदार, अध्यक्ष मनसे विभाग

शनिवारपासून रोज सकाळी 7 ते 10 च्या दरम्यान बेकायदा मासेविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. 15 दिवसात बेकायदा मासेविक्री बंद करण्यात येईल.
- रमाकांत बिरादार, आयुक्त, जी/ एन पालिका विभाग

आमचे पोट मासेविक्रीवरच अवलंबून आहे. बेकायदा फेरीवाल्यामुळे आम्ही रस्त्यावर येऊ. आमचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे.
- सविता पाटील, मासेविक्रेती महिला

Web Title: bhandup mumbai news koli women warning to shivsena