Bharat Bandh : मुंबईत बंद संमिश्र; 608 जण ताब्यात

विरोधी पक्षातर्फे पेट्रोल दरवाढी विरोधा भारत बंद पुकारला होता.यावेळी अंधेरी येथे रेल रोको करण्यात आला.
विरोधी पक्षातर्फे पेट्रोल दरवाढी विरोधा भारत बंद पुकारला होता.यावेळी अंधेरी येथे रेल रोको करण्यात आला.

मुंबई - इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आदी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला सोमवारी मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदच्या समर्थनार्थ आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवले.

संपूर्ण शहरात पोलिसांनी 608 जणांना ताब्यात घेतले; तर सहा जणांना अटक केली. रिक्षा, टॅक्‍सी, बेस्ट वाहतुकीवर बंदचा परिणाम जाणवला, पण लोकल आणि मेट्रो सेवा काही अपवाद वगळता सुरळीत होती. बेस्टच्या 15 बसचे नुकसान झाले आहे. सिद्धिविनायक मंदिरात टपाल तिकिटाच्या प्रकाशनासाठी आलेले मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर काळे झेंडे दाखवलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. बोरिवली येथे मनसेने घोडागाडी आणि सायकल मोर्चा काढला.

कॉंग्रेससह 21 विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदमुळे लहान-मोठी दुकाने, कारखाने, उद्योग संध्याकाळपर्यंत बंद होते. रिक्षा, टॅक्‍सी बंद होत्या. लोकल सेवा सुरळीत असल्याने दैनंदिन जीवनावर फारसा परिणाम दिसला नाही. काही ठिकाणी लोकल अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मनसेने मेट्रोही काही काळ अडवून ठेवली होती.

कॉंग्रेस-मनसे-राष्ट्रवादी एकत्र
एकमेकांना पाण्यातही न पाहणारे कॉंग्रेस आणि मनसेचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरले होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसही रस्त्यावर होती. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत अनेक ठिकाणी बंद पाळला.

कॉंग्रेस नेत्यांचा चकवा
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना आंदोलनापूर्वीच अटक करण्याचा पोलिसांचा बेत होता; मात्र या तिघांनीही पोलिसांना चकवून जोगेश्‍वरी ते अंधेरी असा लोकल प्रवास केला. अंधेरी येथे लोकल अडवण्याच्या प्रयत्नात या तिघांसह 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com