
Mohit Kamboj : "भास्कर जाधव-संजय राऊत यांनी शिंदे गटात येण्यासाठी..." ; मोहित कंबोज यांचा गौप्यस्फोट!
Mohit Kamboj : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटात येण्यासाठी एकनाथ शिंदे यांना १०० वेळा फोन केला होता, असा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. जाधव विश्वास ठेवण्यास योग्य नसल्याने शिंदे नाखूश होते, असं देखील मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.
"भास्कर जाधव आता बडबड करत आहेत. मात्र त्यावेळी टिकीट काढून गुवाहाटीतील हॉटेलसमोर मला शिंदे गटात घ्या, तोपर्यंत मी वापस जाणार नाही, असे म्हणत होते. संजय राऊत देखील भास्कर जाधव यांच्यासोबत होते. भास्कर जाधव त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी उलट-सुलट बोलत होते", असे मोहित कंबोज म्हणाले.
यापूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील मोठा दावा केला आहे. ठाणे शहरात येऊन भास्कर जाधव मुख्यमंत्र्यांवर टीका करतात, पण ठाकरे गटात काहीच उरले नाही, तुम्ही राणे आणि उदय सामंत यांचे काय ते बघा, शिंदे गटात येतो, असे अनेक वेळा फोन भास्कर जाधव यांनी केल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे.
काय म्हणाले होते नरेश म्हस्के -
भास्कर जाधव सध्या ‘मातोश्री’मध्ये आपण किती विश्वासू आहोत हे दाखवण्यासाठी खटाटोप करत आहेत; पण ते जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. तेव्हा ठाकरे कुटुंबाला शिव्यांची लाखोली वाहिली, हे सर्वांना माहीत असल्याचेही म्हस्के यांनी सांगितले.
रविवारी (ता. २६) खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखालील बाईक रॅली आणि गडकरी रंगायतन येथील शिवगर्जना मेळाव्यालाही ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाण्यातील मेळाव्यात भास्कर जाधव यांनी सर्वांचा खरपूस समाचार घेतला. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते माजी महापौर नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे यांच्या नावाचे ब्रँडिंग करण्यासाठी आणि त्यांच्या संवाद यात्रा, परदेशी दौरे करण्यासाठी कुठून पैसा आला, असा थेट सवाल नरेश म्हस्के यांनी केला. तसेच ‘मातोश्री’मधील चंदू-नंदू कोण आणि कोण पैसे मोजतो, यासंदर्भात तोंड उघडायला लावू नका. नाही तर रस्त्यावरून फिरणे मुष्कील होईल, असा इशाराही त्यांनी दिला. आता आदित्य ठाकरे यांच्याकडे ठाकरे या आडनावाशिवाय दुसरे काहीच नाही. त्याचेच भावनिक भांडवल ते करणार असल्याचेही ते म्हणाले.