मुंबई, ठाणेकरांसाठी खूशखबर; भातसा, बारवी तुडुंब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

अन्‌ बारवीचे जलपूजन झालेच नाही...
सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बारवी धरणाचे जलपूजन करण्यात येणार होते. त्यासाठी प्रशासन यंत्रणेकडून तयारीही करण्यात आली होती; मात्र मुरबाड येथील कार्यक्रम लांबल्याने मुख्यमंत्री पुढील कार्यक्रमास उशीर होत असल्याने पुढे निघून गेले. त्यांची गाडी धरणाच्या परिसरातून गेली आणि नेमक्‍या त्याच वेळी हे धरण भरून वाहू लागले.

खर्डी - गेल्या तीन दिवसांपासून शहापूर तालुक्‍यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने खर्डी, कसारा, वेळुक-वाशाळा येथील नदी-नाले भरून वाहू लागले असून मुंबई शहराला ७०% पाणी पुरवठा करणारे भातसा धरणही सोमवारी (ता. २९) सकाळी ११.३० वाजता ८७ टक्के भरून वाहू लागले आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून धरणाचे पाचही दरवाजे सोमवारी संध्याकाळी अर्धा मीटरने उघडण्यात आले असून धरणातून १५५ क्‍युसेक्‍सने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे भातसा धरणाचे उपकार्यकरी अभियंता वाय. डी. पाटील यांनी सांगितले.

धरणाखालील सापगाव ते वासिंदपर्यंतच्या गावांना, पोलिस प्रशासनाला व संबंधित स्थानिक आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. सापगाव येथील पुलाला नदीचे पाणी लागले असून पुलावरून पाणी जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

जलपूजनानंतर विसर्ग
भातसा धरण भरल्याने आमदार पांडुरंग बरोरा व तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांच्या हस्ते जलपूजन व महापूजा करून धरणाचे पाचही दरवाजे (०.५०) अर्धा मीटरने उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यातील तीनही धरणे भरली असून सोमवारी भातसा धरण भरले. सायंकाळी ५ वाजता धरणाचे पाच दरवाजे उघडले असून भातसा नदी किनाऱ्यालगतच्या साजिवली, सावरशेत, सापगाव, खुटघर अशा अन्य गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जलपूजनावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मारुती धिर्डे, भातसा धरणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बारवीही ‘ओव्हरफ्लो’
बदलापूर - भातसा पाठोपाठ आता बारवी धरणही भरल्याने ठाणे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. जुन्या क्षमतेनुसार बारवी शंभर टक्के भरले आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बदलापूरजवळील बारवी धरण सोमवारी भरून वाहू लागल्याने यात आता एक वर्ष पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास धरण भरून वाहू लागले.

बारवी धरणाची क्षमता आता ६८.६० मीटर वरुन ७२.६० मीटर होणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता कालिदास भोंडकर यांनी दिली. धरणाची पाणीसाठवण क्षमता ही २३४ दश लक्ष घनमीटर इतकी होती. आता ती वाढून ३४०.४८ दश लक्ष घनमीटर इतकी होणार आहे. एकूण सहा गावे आणि पाच पाड्यांचे यासाठी पुनर्वसन करण्यात आले आहे. ८०० हेक्‍टर वाढीव जमीन यासाठी लागल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhatasa Baravi Dam Water Full Rain