भावे नाट्यगृहाला मिळणार झळाळी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

नवी मुंबई - नवी मुंबईचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाला आता नवी झळाळी मिळणार आहे. नाट्यगृहाचा कायापालट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यात अंतर्गत सजावटीबरोबरच अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे नाट्यगृहात लिफ्टची सोय केली जाणार आहे.

सिडकोने १९९७ मध्ये विष्णुदास भावे नाट्यगृहाची इमारत बांधून ती महापालिकेकडे हस्तांतरित केली. त्या वेळी अशा दर्जाचे नाट्यगृह मुंबई आणि ठाण्यातही नव्हते. त्यामुळे नाट्यकलावंतांबरोबरच रसिकांनाही या नाट्यगृहाची भुरळ पडली होती; परंतु त्यानंतर या नाट्यगृहाची निगा नसल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नाट्यगृहात पाणी गळती, भिंतीचे पोपडे निघणे आदी प्रकार घडत आहेत. वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त होण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे नाट्य रसिकही नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे नाट्यगृहाची दुरुस्ती व सुशोभीकरण करावे, अशी मागणी रसिकांनी केली होती. मनसेनेही याबाबत आवाज उठवला होता. त्यामुळे महापालिकेने त्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

केली जाणारी कामे
फ्लोअरिंग बदलणे, भिंतींचे फिनिशिंग, फॉल्स सिलिंग, पॅनलिंग, म्युरल्स, वॉल पेपर, आधुनिक व्ही. आर. व्ही. वातानुकूलित यंत्रणा, सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सोईसाठी लिफ्ट, ध्वनी व प्रकाशव्यवस्थेचे अत्याधुनिकीकरण, कलावंतांच्या खोल्या व कार्यालयाचे आधुनिकीकरण, प्रवेश लॉबीचे नूतनीकरण, कलाप्रदर्शन दालन.

Web Title: bhave natyagruha