भीमाशंकर मार्ग आणखी खडतर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या भीमाशंकरच्या दर्शनासाठी खांडस गावातून रायगड जिल्ह्यातील भाविकांबरोबरच मुंबई, ठाण्यातीलही भाविक मोठ्या संख्येने जातात. जंगल पर्यटन आणि ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठीही शेकडो जण या मार्गाला पसंती देतात. 
 

कर्जत : कर्जत तालुक्‍यातील खांडस गावातून डोंगरदऱ्यातून भीमाशंकरकडे जाण्यासाठी असलेल्या पायवाटेतील अत्यंत उपयुक्त असलेली लोखंडी शिडी तुटली आहे. त्यामुळे भाविकांची वाट आणखी बिकट झाली आहे. या शिडीवरून श्रावणी सोमवार, महाशिवरात्र आणि अन्य धार्मिकदिनी हजारोंच्या संख्येने पर्यटक भीमाशंकरला जात होते. 

रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या भीमाशंकरच्या दर्शनासाठी खांडस गावातून रायगड जिल्ह्यातील भाविकांबरोबरच मुंबई, ठाण्यातीलही भाविक मोठ्या संख्येने जातात. जंगल पर्यटन आणि ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठीही शेकडो जण या मार्गाला पसंती देतात. 

खांडस आणि भीमाशंकर डोंगर यांच्या दरम्यान कातळ परिसरात मार्ग सरळ आणि अवघड असल्याने लोखंडी शिडी ठेवण्यात आली आहे. त्याच्या आधारे भाविक, पर्यटक माग्रक्रमण करतात; परंतु काही दिवसांपूर्वी ही शिडी तुटल्याने हा मार्ग बंद झाला आहे. 
कर्जत तालुका प्रशासनाने या घटनेची दखल घेत हा मार्ग धोकादायक झाल्याचे स्पष्ट करून प्रवासास बंदी घातली आहे. 

गणपती घाट पर्यायी मार्ग 
खांडस-भीमाशंकरदरम्यानच्या अवघड वाटेवरील शिडी तुटल्याने आता घाटाला पर्याय म्हणून गणपती घाट या दुसऱ्या मार्गाचा पर्याय निवडण्यात येत आहे; परंतु हा मार्ग पावसाळ्यात निसरडा होत असल्याने धोकादायक झाला आहे. या मार्गाने सुमारे अडीच ते तीन तास अधिक वेळ लागतो; परंतु शिडी घाटाच्या तुलनेत हा मार्ग चढण्यास काहीसा सुरक्षित आणि सोपा असल्याचे या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांचे म्हणणे आहे. 

भाविक, पर्यटकांना का आवडतो हा मार्ग? 
खांडस मार्गाने भीमाशंकरला जाण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या मार्गाचा अनेक जण पर्याय निवडतात. शुभ्र धबधबे, पायवाटेवर उतरलेले ढग आणि त्यात हरविलेली पायवाट हेसुद्धा आकर्षण आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, घनदाट जंगल, विविध रंगी रानफुले आणि भुरळ घालणारे मनमोहक थंड वातावरणही पर्यटकांचे आकर्षण आहे. 

खांडसमार्गे भीमाशंकरला जाणाऱ्या डोंगरातील पायवाटेवरील लोखंडी शिडी तुटल्याने हा मार्ग अत्यंत धोकादायक झाला आहे. त्यामुळे मार्गावर बंदी घालण्यात आली आहे. परिसरातील सरपंच, ग्रामसेवक यांना सूचना दिल्या आहेत. धोक्‍याच्या सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहेत. 
- अविनाश कोष्टी, तहसीलदार कर्जत 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhimashankar road is even harder