चैत्यभूमीवर लोटला जनसागर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी (6 डिसेंबर) अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यांतून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. त्यामुळे चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कचा परिसर गजबजून गेला आहे. 

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी (6 डिसेंबर) अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यांतून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. त्यामुळे चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कचा परिसर गजबजून गेला आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मुंबई महापालिका आणि बेस्टकडून आंबेडकरी अनुयायांसाठी आवश्‍यक सोईसुविधा पुरविल्या जात आहेत. देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी सोमवारपासूनच मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे दादर रेल्वेस्थानकापासून चैत्यभूमीपर्यंतचे सर्व रस्ते गजबजले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्येही गर्दी झाली आहे. शिस्तबद्ध स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्था-संघटनांचे कार्यकर्ते दादर स्थानकापासून चैत्यभूमी- शिवाजी पार्कच्या दिशेने येणाऱ्या अनुयायांना मार्गदर्शन करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी तरुणांचे जत्थे येत आहेत. चैत्यभूमीकडे जाण्यासाठी मोठी रांग लागली आहे. अभिवादन केल्यानंतर हे अनुयायी महापालिकेने शिवाजी पार्क मैदानावर उभारलेल्या मंडपात विश्रांती घेत आहेत. 

"एकच साहेब, बाबासाहेब', "जब तक सूरज चॉंद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा', "संविधान बचाव, देश बचाव' अशा घोषणांनी चैत्यभूमी परिसर दणाणून गेला आहे. या भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून, समता सैनिक दलाचे स्वयंसेवक पोलिसांना सहकार्य करत आहेत. 

अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी मोफत पाणी व भोजन देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. चैत्यभूमी परिसरात क्रांतिगीतांच्या सीडी, ग्रंथ, प्रतिमा व पुतळ्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. परंतु, रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या गटांच्या नेत्यांचे फलक पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई महापालिकेने केलेल्या व्यवस्थेबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले. महापालिका प्रशासनाने दादर स्थानक ते चैत्यभूमीपर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त केला आहे. 

Web Title: bhimsainik on Chaityabhumi for Mahaparinirvan Din