मुंबई - भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांची निवड झाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली.
दर वर्षी राज्य सरकारतर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रांत प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराला भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांची शिफारस केली होती. या समितीत उस्मान खान, सदानंद नायमपल्ली, शाम गुंडावार, भारती वैशंपायन, बाळ पुरोहित आणि शुभदा पराडकर या मान्यवरांचा समावेश आहे.
|