भिसे खिंडीत मृत्यूची टांगती तलवार

नागोठणे : भिसे खिंड मार्गावर दरड व झाडे कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे.
नागोठणे : भिसे खिंड मार्गावर दरड व झाडे कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे.

नागोठणे (बातमीदार) : नागोठणे-रोहा मार्गावरील भिसे खिंड या महत्त्वाच्या व वर्दळीच्या मार्गावर अनेक ठिकाणी दरड व झाडे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे; मात्र यावर प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसून कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाविरोधात जनमानसातून नाराजीचा सूर उमटत आहे.

रोहा हे तालुक्‍याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये या ठिकाणी आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी भिसे खिंड मार्गे मुख्य पण धोकादायक रस्ता आहे. त्यामुळे भिसे खिंड सुरक्षित असणे गरजेचे आहे; मात्र भिसे खिंडीत अनेक ठिकाणी धोकादायक वळणावर संरक्षण कठडेही नसल्याने हा मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे.

दर वर्षी मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वादळवारा, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात या मार्गालगत असलेल्या डोंगरमाळरान पठारावरून मोठमोठे दगड, दरड व झाडे उन्मळून पडतात. अशातच मार्गावर अपघाती घटनांचे प्रमाण वाढते. या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडून वाहतुकीचा खोळंबा झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

पावसाळ्यात तर या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत असुरक्षित व धोक्‍याचे ठरते. या मार्गावर  माळरान पठारावर पर्यटकांचे आकर्षण असलेला नदीकिनारा व धबधब्याचा सेल्फी पॉईंट बनलेला हा मार्ग व परिसर तिन्ही ऋतूत कोसळणाऱ्या दरडी व झाडांमुळे असुरक्षित बनला आहे. या मार्गावर अनेकदा दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने या जीवघेण्या परिस्थितीची तत्काळ दखल घ्यावी. येथील दरड संकट दूर करण्यासह रस्ता रुंदीकरणाचे काम जलदतेने पूर्ण करावे, अशी मागणी प्रवाशांतून जोर धरत आहे.

या मार्गावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक डोकेदुखी बनली आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍नही अधिक जटिल बनत चालला आहे. भिसे खिंडीतून जाणारा मार्ग नागोठणे, सुधागड, अलिबाग, पेण, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, पाली-खोपोली राज्य महामार्ग यांच्यासह मुख्य तालुक्‍यांना जोडणारा मार्ग आहे.

प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करणे सोईचे ठरते. खड्डेमय मार्ग, ठिकठिकाणी तुटलेले संरक्षण कठडे, तसेच भिसे खिंडीत दरड व झाडे कोसळण्याचा धोका यामुळे हा प्रवास आता धोकादायक ठरू लागला आहे.

नागोठणे, भिसे खिंड मार्गे रोहा हा प्रवास सद्यस्थितीत धोकादायक बनला आहे. दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा दुर्घटनाच घडू नये याकरिता खबरदारीची भूमिका प्रशासनाने ठेवावी.
- ॲड. विजयपाल सावंत, प्रवासी

भिसे खिंडीतील धोकादायक वळणावर काही ठिकाणी संरक्षक कठडे बांधले. उर्वरित ठिकाणीही बांधण्यात येतील. याशिवाय धोकादायक दरडी काढण्याचे कामही लवकरच करण्यात येईल.
- एस. ए. घाडगे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम, रोहा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com