भिवंडीत दीड लाख मुस्लिम बाधवांकडून नमाज अदा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात राहणाऱ्या मुस्लिमबांधवांनी महिनाभरात दिवसभर अन्नपाणी प्राशन न करता रोजा (उपवास) करीत रमजान साजरा केला.

भिवंडी : भिवंडी शहर परिसरात मुस्लिम बांधवांच्यावतीने रमजान ईद मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. रिमझिम पाऊस पडत असतानाही मशिदीत, तसेच रस्त्यावर सामूहिकरित्या सुमारे दीड लाख मुस्लिमबांधवानी नमाज अदा केली. या वेळी कोटरगेट मशिदीबाहेर उपस्थित असलेल्या पोलिसांनी मुस्लिमबांधवांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ईदनिमित्त सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात राहणाऱ्या मुस्लिमबांधवांनी महिनाभरात दिवसभर अन्नपाणी प्राशन न करता रोजा (उपवास) करीत रमजान साजरा केला. काल रात्री चंद्र दिसल्यानंतर शहरातील विविध भागात फटाके वाजवून मुस्लिमबांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. सर्व मुस्लिमबांधवांनी आज सकाळी 8.30 वाजता मशिदीबाहेर एकत्र येत पारंपरिक वेशभूषेत पांढरी सलवार व कुर्ता, टोपी परिधान करून सामूहिकरित्या नमाज अदा केली.

महापौर जावेद दळवी, खासदार कपिल पाटील, माजी आमदार महेश चौघुले, आमदार रूपेश म्हात्रे, महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी मुस्लिमबांधवांना शुभेच्छा दिल्या. 

Web Title: Bhivandi Muslim Communities Celebrates Eid