भिवंडी दुर्घटना:  55 तास उलटूनही बचावकार्य सुरु, मृतांचा आकडा 41 वर

शरद भसाळे
Thursday, 24 September 2020

 भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल नगर भागातील जिलानी  इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढत असून 41 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

मुंबईः  भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल नगर भागातील जिलानी  इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढत असून 41 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. सदर ठिकाणी रात्री पासून दुर्गंधी पसरण्यास सुरवात झाल्याने सुरक्षितता म्हणून सदर भागात तातडीने जंतुनाशक औषध फवारणी आणि निलगिरी औषध फवारणी करण्यात येत असल्याची माहिती डॉ. मिलिंद भोईर यांनी घटनास्थळी दिली. 

घटनास्थळी सुरु असलेल्या बचाव कार्यात सतत पाऊस पडत असल्याने एनडीआरफ, टीडीआरफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जेसीबी आणि पोकलनच्या साह्याने मातीचे ढिगारे उपसण्याचे काम सुरु असून अद्याप 10 जण मातीच्या ढिगाऱ्या खाली असल्याची शक्यता जवानांकडून व्यक्त केली जात आहे.

भर पावसात सुरु असलेल्या बचाव कार्यात जवानांना हस्नील आरिफ शेख (3),मुदशीर हनीफ अन्सारी (27),फरीदा भानू मुर्तुजा खान (32),आरिफ मुर्तुजा खान (3),मोमीन समीउल्लं शेख (65),परवीन शब्बीर कुरेशी (27) मरियम,शब्बीर कुरेशी  (12), पलक बानू मोहमद मुर्तुजा खान (5),फरहा मोहमद मुर्तुजा खान (6),रिया खान (3) आणि इतर पाच असे एकूण चाळीस मृतदेह आता पर्यंत जवानांना काढण्यात यश आले आहे. या भीषण दुर्घटनेत दहा वर्षाखालील 12 मुलं-मुली तर 18 पुरूष, 12 महिलांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान महापालिका प्रशासनाने शहरातील 5 प्रभागातील असलेल्या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्व्हे सुरु केला असून सदर इमारतीमध्ये राहणाऱ्या  रहिवाशांनी इमारती रिकाम्या करव्यात असे आवाहन पालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी केले आहे. तसेच महापालिका आयुक्तांच्या आदेशावरून पाच प्रभागात असलेल्या सुमारे 210  धोकादायक इमारतीचे नळ कनेशन आणि विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश मिळाल्याने सदरची कारवाई सुरु झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे रहिवासी नागरिक हवालदिल झाले आहेत तर काही रहिवासी नागरिक आपल्या गावीआणि नातेवाईकां कडे जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

अधिक वाचाः  नायर रुग्णालयात दरवर्षी साचते पाणी, यंदाच्या पावसात दोन वेळा

भिवंडीत भीषण इमारत दुर्घटना झाल्यामुळे राज्यातील मंत्री वर्ग घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करण्याकरिता येत असून बुधवारी सकाळी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पालिका आयुक्त डॉ.आशिया यांच्या सोबत त्यांच्या दालनात मदतकार्य आणि धोकादायक इमारतीचा आढावा घेतला शासन स्तरावर मदत देण्याबाबत त्यांनी आयुक्त डॉ.आशिया यांना आश्वासन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर, नायब तहसीलदार गोरख फडतरे सह काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

---------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Bhiwandi building collapse incident Death toll rises 41


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhiwandi building collapse incident Death toll rises 41