भिवंडीत MIM नेत्याच्या बंगल्यावर छापा, लहान भावासह ७ जण पोलिसांच्या ताब्यात

पूजा विचारे
Friday, 25 September 2020

भिवंडी शहरातल्या एमआयएम नेत्याच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला आहे. भिवंडी शहरातील समदनगर येथील एमआयएम शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या बंगल्यावर मध्यरात्री छापा मारला.

मुंबईः भिवंडी शहरातल्या एमआयएम नेत्याच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला आहे. भिवंडी शहरातील समदनगर येथील एमआयएम शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या बंगल्यावर मध्यरात्री छापा मारला. या छापेमारीसाठी तब्बल ३० ते ३५ पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसंच स्थानिका पोलिसांना बाहेर ठेवण्यात आलं होतं. पोलिसांच्या गाड्या आणि मोठ्या प्रमाणाता झालेला गदारोळ पाहून या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं तिथे जमले होते. मात्र पोलिसांनी या नागरिकांवर सौम्य लाठीचार्ज केला आणि त्यांना तिथून पिटाळून लावले. 

या छाप्यात खालिद गुड्डू यांच्या लहान भावासह सात जणांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं. भिवंडी शहरातील बांधकाम व्यावसायिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ठाणे गुन्हे आणि खंडणी विरोधी  पथकाने पंजाब आणि नाशिक नंबरच्या 30 गाड्यामध्ये येऊन गुड्डू यांच्या बंगल्यावर सापळा रचून  सव्वा लाख रुपयांच्या खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडलं. या कारवाईमध्ये आरोपी खालिद गुड्डू आणि त्याचे भाऊ इफ्तीखार मुक्तार शेख उर्फ बबलू उर्फ कानिया, फैज आलम, गुलाम खान या चौघांना अटक करून पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.   या बाबत भिवंडी शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 364 अ, 386, 387, 34 arms act 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अधिक वाचाः  भिवंडी इमारत दुर्घटनेत २० चिमुरड्यांचा निप्षाप मृत्यू

खालिद गुड्डू कोण आहे? 

खालिद गुड्डू हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष होते. त्याचे व्यक्तिमत्त्व हे वादग्रस्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत ते एमआयएममध्ये गेले. सध्या ते एमआयएममध्ये शहराध्यक्ष आहे. त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती. त्यासाठी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसीच्या भिवंडीत सभा देखील घेण्यात आल्या होत्या. ते माजी नगरसेवक देखील आहेत. 10 वर्षांपूर्वी त्यांच्या भावाला दिल्ली पोलिसांनी अशाच पध्द्तीने अटक केली होती. खालिद गुड्डू यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत आणि काही गुन्हा आता निकाली निघालेत.

Bhiwandi mim leaders khalid guddu bungalow raid extortion police trap


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhiwandi mim leaders khalid guddu bungalow raid extortion police trap