कडक उन्हात तापला प्रचार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

भिवंडी - भिवंडी शहर महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या पुढाऱ्यांनी येथे येऊन प्रचाराचा नारळ फोडला आहे. प्रमुख नेत्यांनी प्रभागातील स्थानिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन प्रचार कार्यालये उघडली आहेत. सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही सज्ज झाले असून, ते भरउन्हात जोरदार प्रचार करत आहेत.

भिवंडी - भिवंडी शहर महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या पुढाऱ्यांनी येथे येऊन प्रचाराचा नारळ फोडला आहे. प्रमुख नेत्यांनी प्रभागातील स्थानिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन प्रचार कार्यालये उघडली आहेत. सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही सज्ज झाले असून, ते भरउन्हात जोरदार प्रचार करत आहेत.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी भिवंडीत तळ ठोकून निवडणुकीची सूत्रे हातात घेतली आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक विकास पाटील भाजपमध्ये गेले होते; मात्र तेथे त्यांची फसवणूक झाल्याने त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश करून पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांचे शिंदे यांनी स्वागत केले. पक्षातर्फे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार रूपेश म्हात्रे, शहरप्रमुख सुभाष माने यांच्याशी चर्चा करून प्रचार आराखडा आखला जात आहे. 

शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर, नारायण चौधरी, विकास पाटील, संजय कबुकर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क करण्यासह समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौगुले, शहराध्यक्ष संतोष शेट्टी निवडणुकीची सूत्रे सांभाळत आहेत. भिवंडीत मुंबई व लातूर पॅटर्न राबविण्यासाठी पाटील यांनी आराखडा तयार केला असून, त्याबाबत भिवंडी स्तरावर विशेष बैठका सुरू आहेत. भाजपने ५८ जणांना उमेदवारी दिली असून, उमेदवारी देताना उत्तर भारतीय साम्राज्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नाराजी आहे. याची दखल घेत पाटील यांनी उत्तर भारतीय समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. समाजवादीचे आमदार अबू आझमी यांनीही सोमवारी (ता. १६) भिवंडीत येऊन विविध प्रभागात जाऊन उमेदवारांसह प्रचाराला सुरुवात केली. 

सुट्यांनुसार वेळापत्रक तयार
भिवंडी शहरात मतदारांशी थेट संपर्क साधण्यास प्राधान्य दिले जात आहे. तीव्र उन्हामुळे उमेदवारांकडून सकाळी व संध्याकाळी आपल्या प्रभागात प्रचारफेऱ्यांचे वेळापत्रक निश्‍चित करून प्रचार सुरू आहे. त्यात यंत्रमागनगरी भिवंडीत शुक्रवारी कामगारांची साप्ताहिक सुट्टी असल्याने त्यांच्या वस्त्यांमध्ये १९ मे रोजी प्रचारफेऱ्या काढल्या जाणार आहेत. व्यापारी व स्थानिक रहिवाशांच्या भागात शनिवारी व रविवारी मतदारांची भेट घेतली जाणार आहे.

Web Title: Bhiwandi municipal corporation election