भिवंडीत ९ जूनला महापौर निवडणूक

भिवंडीत ९ जूनला महापौर निवडणूक

भिवंडी - भिवंडी महापालिकेची महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक ९ जूनला होणार आहे. पदासाठी नगरसेवकांमध्ये धावपळ उडाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने व्यूहरचना सुरू केल्याने काँग्रेसही सतर्क झाली आहे. नगरसेवकांत फूट पडू नये, यासाठी काँग्रेसने नगरसेवक सुरक्षित स्थळी नेऊन ठेवल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिवसेनेने अद्यापही भूमिका जाहीर केली नसली, तरी ते काँग्रेससोबत सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षातील पुढारी देत आहेत.

भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला ९० पैकी ४७ जागा मिळाल्याने त्यांना महापालिकेत बहुमत मिळाले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप आघाडीला २९ जागा मिळाल्या आहेत; तर शिवसेनेला १२ जागा मिळाल्या आहेत. भिवंडी महापालिकेत महापौर आणि उपमहापौर बसवून सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. त्याला शह देण्यासाठी भाजपने कोणार्क विकास आघाडी, आरपीआय आणि अपक्ष नगरसेवकांशी संपर्क साधून इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्यासोबत घेण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत बोलणीही सुरू झाली आहेत. राज्यात मित्रपक्ष म्हणून सत्तेत असलेल्या शिवसेनेने भाजपला भिवंडीत पाठिंबा द्यावा, यासाठी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ‘मातोश्री’शी संपर्क साधला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आतुर झाला असला, तरी शिवसेना ही मुख्य भूमिकेत असल्यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा द्यावा, यासाठी भिवंडीतील स्थानिक पुढारी शिवसेनेच्या संपर्कात असून शिवसेना त्यांना अनुकूल असल्याचे नगरसेवक सांगत आहेत. शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही, अशी माहिती शिवसेना आमदार रूपेश म्हात्रे यांनी दिली. वरिष्ठांच्या सूचनेनंतर भूमिका जाहीर करू, असे म्हात्रे यांनी सांगितले. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम 
भिवंडी महापालिकेची महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (ता.९) दुपारी ३.३० वाजता महापालिकेच्या सभागृहात महापालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज उद्या (ता.५) सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत पालिकेचे नगरसचिव यांच्या दालनात दाखल करायचे आहेत. सदर नामनिर्देशनपत्रींची छाननी व वैध उमेदवाराची यादी पीठासीन अधिकारी यांच्याकडून ९ जूनला घोषित केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. महापौरपदासाठी मतदानाची आवश्‍यकता भासल्यास हात वर करून ते घेतले जाईल, अशी माहिती नगरसचिव अनिल प्रधान यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com