कार्यकर्त्यांना लढायचेय स्वबळावर!

शरद भसाळे
सोमवार, 1 मे 2017

प्रचाराचा धुरळा उडणार
पालिकेतील गैरव्यवहार, टोरेंट पॉवर कंपनी, यंत्रमाग पॉवरलूम उद्योग, रस्ते, पाणी, अस्वच्छता, झोपडपट्टीतील नागरिकांच्या समस्या आदी प्रचाराचे मुद्दे बनवत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, सप प्रचाराचा धुरळा उडवणार असल्याची चर्चा आहे.

भिवंडी - भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या २४ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी  जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांकडून युतीसाठी विरोध होत आहे. तरीही राज्य पातळीवर युतीसंदर्भात वाटाघाटी सुरू असल्याचे समजते. काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी न करता स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत नाराजी आहे. भाजपने रिपब्लिकन पक्षाची साथ घेण्याची हालचाल केली आहे. 

महापालिकेच्या निवडणुकीसाठी शनिवारी (ता.२९) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. भाजपची भिवंडीतील ताकद वाढल्याचा दावा आमदार महेश चौघुले यांनी केला आहे. भाजपला भिवंडीतील ९० पैकी ५५ जागा हव्या असल्याने शिवसेना पदाधिकारी नाराज आहेत. त्यांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती आमदार रूपेश म्हात्रे, शहरप्रमुख सुभाष माने यांनी दिली. युतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, असेही माने म्हणाले. शिवसेनेची तयारी पाहता भाजपनेही तीच भूमिका घेत ७० जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजप शहर अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली. 

राष्ट्रवादी-काँग्रेसची आघाडी व्हावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेख खालिद गुड्डू यांनी व्यक्त केली; मात्र काँग्रेस शहर अध्यक्ष शोहेब गुड्डू खान यांनी राष्ट्रवादीची मागणी फेटाळली. भिवंडीत राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसची ताकद जास्त असल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे शोएब खान यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी ‘सप’शी आघाडी करण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गणेश नाईक यांनी सपचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांच्याकडे तसा प्रस्ताव मांडल्याचे सांगण्यात आले. भिवंडीत सपचे १७ नगरसेवक असून, यंदा ७० जागा लढवण्याची तयारी असल्याचे सपचे सलाम नोमानी यांनी सांगितले.   

मागील निवडणुकीत सहा जागांवर यश मिळवणाऱ्या कोणार्क विकास आघाडीचे गटनेते, माजी महापौर विलास पाटील यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला सहकार्य केले होते. यंदाही भाजपशी युती करण्यास ते इच्छुक आहेत. त्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आघाडीचे कृष्णा गाजेंगी यांनी सांगितले. मनसेला १५ वर्षांत भिवंडीत एकही जागा मिळालेली नाही. तरीही मनसे २५ जागांवर लढणार आहे, अशी माहिती मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे व जिल्हाध्यक्ष मदन पाटील यांनी दिली. ‘एमआयएम’ यंदा प्रथमच निवडणुकीत उतरणार असल्याने काँग्रेस, सपमध्ये अस्वस्थता आहे. २४ जागांवर उमेदवार देणार असल्याचे एमआयएमचे रौफ लाला व शादाब उस्मानी यांनी सांगितले.

Web Title: Bhiwandi municipal election