दाखले, परवानगीसाठी उमेदवारांची धावपळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

भिवंडी - भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना विविध प्रकारच्या 12 परवानग्या लागणार आहेत. त्या देण्यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलिस व पालिका प्रशासनाने एक खिडकी योजना 29 एप्रिलपासून सुरू केली आहे. पालिका अधिकारी व कर्मचारीवर्गात समन्वय नसल्याने परवानगी दाखले मिळवण्यासाठी उमेदवारांसह पक्षांच्या कार्यकर्त्यांची धावपळ उडत आहे. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला असून भिवंडी पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. 

भिवंडी महापालिकेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता व कायद्यांचे पालन करावे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना नियमावली दिली आहे. उमेदवाराकडे निवडणूक लढवताना स्वतःकडे वैयक्तिक शौचालय असणे गरजेचे आहे. पालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी भरणे आवश्‍यक आहे. मिरवणूक परवानगी, बॅनर, पोस्टर, स्टेज, सभा, वाहन परवाना, तसेच प्रचारसभा, पालिकेचा कंत्राटदार नसल्याचा दाखला व गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसल्याचा दाखला घेणे आवश्‍यक आहे. हे सर्व प्रकारचे दाखले उमेदवारांना नामनिर्देशन अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. तासाभरात उमेदवारांना दाखले देण्याचे आदेश निवडणूक अधिकारी तथा पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत; मात्र उमेदवारांना वेळेत परवानगी व दाखले मिळत नसल्याने ते नाराज आहेत. दरम्यान, कामामध्ये सुसूत्रता आहे, अशी प्रतिक्रिया दाखल्यांचे वाटप करणारे अधिकारी राजू वरळीकर यांनी दिली. 

470 हून अधिक अर्ज 
विविध परवाने आणि दाखल्यांसाठी सुमारे 470 हून अधिक अर्ज आले आहेत. पोलिसांकडून उमेदवारांना चारित्र्याचा दाखला मिळण्यासाठी ऑनलाईन प्रकिया राबविण्यात आली आहे; मात्र दाखला घेण्यासाठी उमेदवारांना ठाणे येथील पोलिस आयुक्त कार्यालयात जावे लागत आहे. हे दाखले भिवंडीत मिळावेत यासाठी पोलिस उपायुक्तांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विविध पक्षांनी केली आहे. 

Web Title: Bhiwandi municipal election