उमेदवारांवर आयोगाची करडी नजर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

भिवंडी - भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व निवडणुकीत होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. आयोगाच्या आदेशावरून पालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी चार विशेष पथके स्थापन केली आहेत. या पथकांद्वारे उमेदवारांवर नजर ठेवून कायद्यांचे व आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश नुकत्याच झालेल्या प्रशिक्षण शिबिरात देण्यात आल्याने कर्मचारी व अधिकारी सतर्क झाले असून, त्यांनी विविध प्रभागांत जाऊन उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

भिवंडी - भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व निवडणुकीत होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. आयोगाच्या आदेशावरून पालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी चार विशेष पथके स्थापन केली आहेत. या पथकांद्वारे उमेदवारांवर नजर ठेवून कायद्यांचे व आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश नुकत्याच झालेल्या प्रशिक्षण शिबिरात देण्यात आल्याने कर्मचारी व अधिकारी सतर्क झाले असून, त्यांनी विविध प्रभागांत जाऊन उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उमेदवारांनी प्रभागात प्रचार सुरू केल्याने पालिकेच्या पथकाने त्यांचे व्हिडीओ शूटिंग व कॅमेरा फोटो काढून नोंद सुरू केली आहे. 

भिवंडी पालिकेच्या निवडणुकीचे कामकाज सुरळीत व्हावे, आचारसंहिता व कायद्याची अंमलबजावणी योग्यरीत्या व्हावी यासाठी पालिका सभागृहात निवडणूक अधिकारी, कर्मचारी वर्गाची विशेष बैठक झाली. उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता पथकाचे शिवाजी पाटील, नंदकुमार कोष्टी, उपायुक्त विनोद शिंगटे आदी अधिकारी या वेळी उपस्थित होते. मतदारांना प्रलोभन दाखवणे, विनापरवाना बॅनर, फलक, मंडप व स्टेज वापरणे, प्रचारसभा व त्यातील परवानगी असलेली वाहने, उमेदवारांनी खर्चातून दाखविलेल्या जाहिराती, आर्थिक व्यवहार, मद्याची गैरप्रकारे ने-आण करणे व निवडणूक काळात होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी पालिकेने शहरातील नादीनाक, साईबाबा नाका, अंजूरफाटा, चेक पोस्ट कारिवली, मिल्लतनगर, पोगाव या ठिकाणी चेक पोस्ट निर्माण करून कर्मचाऱ्यांचे पथक तसेच उमेदवारांवर नजर ठेवण्यासाठी तीन पथके नेमली आहेत. या पथकांमध्ये पालिका कर्मचारी, पोलिस, सेल्स टॅक्‍स, इन्कम टॅक्‍स, एक्‍साईज, आरटीओ आयडी अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. 

नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक 
नागरिकांनी तक्रार दाखल करण्यासाठी 18002331102 हा टोल फ्री क्रमांक वापरावा, असे आवाहन आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले. आचारसंहितेच्या काळात आतापर्यंत 288 पोस्टर्स, 531 बॅनर्स व 169 झेंडे काढण्यात आले आहेत; तर आचारसंहितेचा भंग करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. 

Web Title: Bhiwandi municipal election