याद्यांचा घोळ मिटेना; उमेदवारांचा प्रश्‍न सुटेना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बोगस, मृत व दुबार मतदारांची नावे वगळणयाची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुबार नावांसमोर स्टार मार्किंग केले जाईल. मतदारांनी मृत, दुबार नावांबाबत पालिकेस माहिती द्यावी. मतदार जनजागृतीसाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे. बोगस मतदान होणार नाही, याचीही काळजी घेतली जणार आहे. 
- डॉ. योगेश म्हसे, पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी.

भिवंडी - भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग रचना व अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी याद्या घेण्यासाठी शहरातील निवडणूक कार्यालयात गर्दी केली आहे. मतदार याद्यांमधील मृत व दुबार बोगस नावे वगळण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने देऊनही अद्याप पालिकेच्या निवडणूक विभागाकडून कार्यवाही झाली नसल्याने उमेदवार व नागरिकांत संभ्रम आहे. 

भिवंडी महापालिकेच्या मतदार याद्यांमध्ये ५० हजार बोगस मतदारांच्या नावांची घुसखोरी झाल्याची याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मागील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला व पालिका निवडणूक शाखेला बोगस मतदारांची नावे कमी करण्याचे आदेश देऊन ५ मेपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे; मात्र भिवंडी निवडणूक विभागाने बोगस मतदार, मृत व दुबार नावे वगळण्याबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नसल्याने उमेदवार नाराज आहेत. 

भिवंडी पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्याची तयारी सुरू आहे. २४ मे रोजी मतदान असल्याने निवडणूक कार्यालयातून मतदार याद्या घेतल्या जात आहेत. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी व छाननी होत असताना याद्यांमध्ये दुबार व मृत मतदारांची नावे अद्याप वगळण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. माजी नगरसेवक सिद्धेश्‍वर कामूर्ती यांनी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्याकडे दुबार नावांसंदर्भात तक्रार केली आहे. मतदारांची नावे इतर प्रभागात गेल्यामुळे मतदारही संभ्रमात आहेत. 

सुविधा जनजागृतीकडे दुर्लक्ष
भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीसाठी मॉडेल पोलिंग बूथ उभारण्यात येणार आहेत. मतदान केंद्रांत अपंग, अंधांसाठी रॅम्प, पंखे, पाणी, शौचालय आदी सुविधा द्या, असे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत; मात्र यासंदर्भातही कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली दिसत नाही. मतदार जनजागृती उपक्रम राबविण्याच्या आदेशाचीही अंमलबजावणी होत नसल्याने राजकीय पक्षांच्या पदाधिकारी नाराज आहेत.

अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट
नावे वगळण्याबाबत न्यायालयाचा अद्याप आदेश मिळालेला नाही. मतदारांची नावे वगळणे हे काम जिल्हा प्रशासनाचे आहे, असे सांगून निवडणुकीच्या मतदार याद्यांचे काम पाहणारे सहायक अधिकारी बिपीन सापटे यांनी हात वर केले, तर निवडणुकीचे काम पाहणारे निवडणूक अधिकारी श्रीकांत औसरकर यांच्याशी संपर्क केला असता, निवडणूक प्रक्रियेचे काम सुरू आहे. पालिका आयुक्तांकडून आदेश येतील, तशी कामे केली जातील, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Bhiwandi municipal election voting list