भिवंडीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना वॉकीटॉकी

bhiwandi-municipal
bhiwandi-municipal

भिवंडी - भिवंडीत पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पालिकेतर्फे वायरलेस वॉकीटॉकी देण्यात आले आहेत. सर्व प्रभाग समिती कार्यालयात विशेष पाच आपत्कालीन केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. मनोहर हिरे यांनी ‘सकाळ’ला दिली.

भिवंडीजवळ खाडी असल्याने शहराला अनेक वेळा पुराचा फटका बसला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आयुक्त मनोहर हिरे यांनी तातडीने पालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची सोमवारी (ता.२८) सकाळी आपत्कालीनपूर्व नियोजन बैठक घेतली. बैठकीस सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, टोरेंट पॉवर कंपनीचे अधिकारी, एसटी महामंडळ भिवंडी आगरप्रमुख यांचे प्रतिनिधी, बीएसएनएलचे अधिकारी उपस्थित होते. 

शहरातील सर्व मुख्य नाल्यांची सफाई सुरू आहे. काही ठिकाणी नाल्यांची रुंदी व खोली वाढवण्यात येत आहे. काही नाल्यांची डागडुजी केली आहे. 

उघड्या गटारावर चेंबर टाकले जाणार आहेत. हे काम १ जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधित अधिकारीवर्गाला दिल्या आहेत, अशी माहिती हिरे यांनी दिली. 

पालिकेचे आरोग्य व बांधकाम, विद्युत विभागातील अधिकारी यांची विविध कामे योग्यरीत्या होत आहेत की नाही, हे पाहण्यासाठी विशेष नेमणूक केली आहे. आपत्कालीन परिस्थिती कामात कसूर आढळून आल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त हिरे यांनी दिला आहे.

भरती-ओहोटीवरही लक्ष
पालिकेतर्फे झाडांची छाटणी सुरू केली आहे. तातडीची बाब म्हणून उद्यान विभागात स्वतंत्र झाडछाटणी पथक तयार केले आहे. अग्निशमन विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. खाडीकिनारी पूरस्थिती निर्माण झाल्यास जवळच्या शाळेत, सांस्कृतिक केंद्रात पूरग्रस्त स्थलांतरित नागरिकांची तातडीची सोय करण्यात येणार आहे. पावसाळ्यात समुद्रातील भरती-ओहोटीच्या वेळेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. 

अशी असेल व्यवस्था
 महापालिका मुख्य इमारतीत मुख्य आपत्कालीन व्यवस्था केंद्र २४ तास कार्यरत. 
 अधिकारी, कर्मचाऱ्यांना संपर्क साधण्यासाठी वॉकीटॉकी. 
 मुख्य आपत्कालीन कक्षात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेळेनुसार नेमणुका. 
 अत्यावश्‍यक कामगार, कर्मचाऱ्यांसह वाहने, हेल्मेट, दोर, टायर, ट्युब, मेगा फोन, चार्जर, बॅटरीची सुविधा.
 पालिकेचा १ ते ५ प्रभाग समिती कार्यालयात १ जूनपासून स्वतंत्र आपत्कालीन कक्ष.
 कक्षात स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती.
 आपत्कालीन व्यवस्थापन केंद्रासाठी सुमारे २५० विशेष कर्मचारी, अधिकाऱ्यांची नेमणूक.

सर्व विभागांचे संपर्क नंबर जाहीर 
रस्त्यावर नवीन खोदकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे. डोंगरउतारावर राहणारे रहिवासी, झोपडपट्टीतील नागरिक यांना खबरदारीचा उपाय म्हणून नोटिसा देण्यात आल्या आहेत. अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शहरातील डॉक्‍टर, रुग्णवाहिका, सामाजिक संस्था, जीवरक्षक पथक यांची यादी तयार केली आहे. सर्व विभागाचे संपर्क नंबर जाहीर करण्यात आले आहेत. काही आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यास महापालिकेच्या मुख्य्य आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा. कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ः २५००४९/२३२३९.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com