भिवंडीची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

भिवंडी - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत भिवंडी महापालिकेची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे सर्व पातळीवर आटोकाट प्रयत्न सुरू आहेत, असा दावा आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केला. या कामात अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही डॉ. म्हसे यांनी येथे झालेल्या बैठकीत दिला. 

भिवंडी - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत भिवंडी महापालिकेची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे सर्व पातळीवर आटोकाट प्रयत्न सुरू आहेत, असा दावा आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केला. या कामात अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही डॉ. म्हसे यांनी येथे झालेल्या बैठकीत दिला. 

भिवंडी पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामगार वस्ती आणि झोपडपट्टी परिसर असल्याने संपूर्ण हागणदारीमुक्तीसाठी पालिकेने ‘गुड मॉर्निंग’ पथकांच्या मदतीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. म्हसे यांनी सांगितले. पालिका क्षेत्रातील विविध २५ ठिकाणे निश्‍चित करून या ठिकाणी उघड्यावर शौचास येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालयांचा वापर करण्याबाबतच्या सूचना देण्यात येत आहेत. याकडे दुर्लक्ष करून उघड्यावर शौचास बसणाऱ्या सुमारे ९५ नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शहर स्वच्छतेसाठी प्रमुख ठिकाणी उघड्यावर शौचास जाऊ नये, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा, शहर हागणदारीमुक्त करा, असे आवाहन करण्यात येत आले. लाऊड स्पीकरवरून दवंडी पिटून जनजागृती केली जात आहे. शहरात नागरिकांच्या सोईसाठी २४ सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती; तर ७२ स्वच्छतागृहांची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली आहे. स्वच्छतागृह चालवण्यासाठी सेवाभावी संस्था, महिला बचत गटांची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार शहरात विविध १६ ठिकाणी नवीन सार्वजनिक व सामुदायिक शौचालये बांधण्याचे प्रस्तावित आहे, असे डॉ. म्हसे यांनी सांगितले. 

फिरत्या शौचालयांची सोय
भिवंडी महापालिकेने शहरातील नुरीनगर, चव्हाण कॉलनी, गौतमनगर, नवी वस्ती, भादवड, शांतीनगर, कामतघर, ताडाळी, कृष्णानगर, नारपोली, इदगाह स्लाटर हाऊस, रामनगर, साठेनगर आदी ठिकाणी फिरत्या शौचालयाची सोय केली आहे. सर्व पातळीवर स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त होईल, असा विश्‍वास आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी व्यक्त केला. 

Web Title: Bhiwandi news Commissioner Dr. Yogesh Mhase