भिवंडीत कोसळधारेने पूरसदृश स्थिती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

भिवंडी - शहर परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळित झाले. विविध मुख्य महामार्गांवरील रस्त्यावर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. शहरातील सखल भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ईदनिमित्त खरेदी, बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. विद्युतपुरवठा खंडित झाल्याने यंत्रमाग कारखान्यातील खडखडाट थांबला होता. कामतघर, फेणे गाव, अशोकनगर आदी भागांत रस्त्यांलगतची झाडे मोटरसायकल, चारचाकींवर कोसळून वाहनांचे नुकसान झाले. 

पावसाने जोर धरल्याने शहरातील तीनबत्ती चौक, शिवाजीनगर, भाजी मार्केट, कणेरी, दरगाह रोड, काळूबाई चाळ, भोईवाडा, सौदा मोहल्ला, म्हाडा कॉलनी, नदी नाका, भिवंडी-ठाणे रोड, कामतघर, पद्मानगर, कणेरी, निजामपुरा पोलिस ठाणे अशा ठिकाणच्या सखल भागांत रस्त्यावर पाणी साचले. भीतीने अनेक रहिवाशांनी घरातील; तर व्यापाऱ्यांनी दुकानातील किमती सामान इतरत्र हलवले. मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली चौक व राजनोली चौकात उड्डाणपूल बांधकाम आणि रस्तारुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली. भिवंडी-वाडा महामार्गावरील वाहतूक व्यवस्थाही कोलमडली. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांचा वेग मंदावला. भिवंडी-कल्याण रोड, भिवंडी-ठाणे मार्गावरील अंजूरफाटा चौकातही वाहनांची कोंडी झाल्याने एसटी बस व ट्रक, खासगी गाड्या अडकून पडल्या होत्या. नाले-गटारांची सफाई योग्य पद्धतीने न झाल्याने त्यातील सांडपाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र चिखल होऊन दुर्गंधी पसरली होती. पावसाचा जोर कायम असल्याने पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालून परिस्थितीचा आढावा घेत होते.

भाजी मार्केटमध्ये दुर्गंधी
सतत कोसळत असलेल्या पावसामुळे पद्मानगर, शिवाजीनगर भाजी मार्केटमध्ये रस्त्यावर नाले-गटारांचे सांडपाणी आल्याने सर्वत्र चिखल निर्माण झाला होता. दुर्गंधीमुळे नाक मुठीत धरून भाजी व सामान खरेदी करावे लागत होते. अनेक महिला चिखलात पाय घसरून पडल्याने त्यांचे हाल झाले. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी कचरा न उचलल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत होते.

Web Title: bhiwandi news rain