भिवंडीत पासपोर्टची प्रक्रिया एका दिवसात!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी पासपोर्ट कार्यालय सुरू झाले आहे. या केंद्राद्वारे भिवंडीवासीयांना लवकरच एका दिवसात प्रक्रिया करून पासपोर्ट मिळतील, अशी माहिती भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी दिली.

भिवंडी : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना भिवंडी शहरात राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी पासपोर्ट कार्यालय सुरू झाले आहे. या केंद्राद्वारे भिवंडीवासीयांना लवकरच एका दिवसात प्रक्रिया करून पासपोर्ट मिळतील, अशी माहिती भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी दिली; तर ठाणे-भिवंडी मेट्रो प्रकल्पाच्या निविदा काढण्यात आल्या असून, २०२३-२४ मध्ये मेट्रो धावेल. तसेच भिवंडीत जागतिक दर्जाचे एम्स रुग्णालय, वैद्यकीय रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे खासदार पाटील यांनी नमूद केले.

भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी मंजूर केलेल्या भिवंडी शहरातील ब्राह्मण आळी येथील टपाल कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्‌घाटन गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. या वेळी खासदार पाटील बोलत होते. याप्रसंगी राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, महापौर जावेद दळवी, आमदार रूपेश म्हात्रे, महेश चौघुले, शांताराम मोरे, पं. स. सभापती रविना जाधव, जिल्हा परिषदेच्या सभापती सपना भोईर, उपमहापौर मनोज काटेकर, संतोष शेट्टी, हनुमान चौधरी, महेंद्र गायकवाड, शांताराम भोईर आदी उपस्थित होते. 

नागरिकांची गैरसोय दूर

पासपोर्ट केंद्रामुळे भिवंडी शहराबरोबरच भिवंडी तालुका, कल्याण, बदलापूर, वाडा, मुरबाड आणि शहापूर तालुक्‍यातील नागरिकांची सोय होईल. आता पासपोर्टसाठी नागरिकांना ठाण्याला फेरी मारावी लागणार नाही, असे खासदार कपिल पाटील यांनी नमूद केले. या केंद्रातून एका दिवसात पासपोर्ट मिळण्यासाठीही लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती खासदार पाटील यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhiwandi passport processing in one day!