भिवंडीत मासेमारी करायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

पूजा विचारे | Sunday, 30 August 2020

भिवंडीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कामवारी नदीत दोन सख्खे भाऊ बुडाल्याची घटना घडली आहे. मासेमारी करण्यासाठी गेले असता ही दुर्देवी घटना घडली. 

मुंबईः भिवंडीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कामवारी नदीत दोन सख्खे भाऊ बुडाल्याची घटना घडली आहे. मासेमारी करण्यासाठी गेले असता ही दुर्देवी घटना घडली. 

शहबाज अन्सारी (वय-24) आणि शाह आलम अन्सारी (वय-22) अशी मृतांची नावं आहेत. दोघेही मुंबईतील मिल्लत नगर येथील रव्हेरा प्लाम्स अपार्टमेंटमधील रहिवासी होते. बुडालेल्या दोन्ही भावांचा मृतदेह अग्निशमक दलानं शोधला आहे. मासेमारी करताना सेल्फी काढत असताना दोन्ही भाऊ पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक वाचाः  सुशांतच्या बँक अकाऊंटमधल्या ७० कोटींचा असा झाला व्यवहार, वाचा सविस्तर

शनिवारी शहबाज आणि शाह आलम हे दोघे जण दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आपल्या आईसोबत भिवंडीमधील कामवारी नदीत चाविंद्रा पेट्रोल पंपाच्यामागे मासे पकडण्यासाठी गेले होते. मासेमारी करत असताना सेल्फी घेण्याच्या नादात एका भावाचा पाय घसरला आणि तो नदीच्या प्रवाहात वाहत जाऊ लागला. भावाला बुडताना पाहून दुसऱ्या भावानं आईकडची ओढणी घेतली आणि पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं एकामागोमाग एक दोन्ही सख्खे भाऊ बुडू लागले. दोन्ही मुलांना बुडताना पाहून आईनं आराडओरड केली आणि मदतीसाठी रस्त्याच्या दिशेनं धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोन्ही भावाना जलसमाधी मिळाली होती.

अधिक वाचाः  लोकल नाहीतर मुंबईत लवकरच सुरु होणार 'ही' सेवा, वाचा सविस्तर

या घटनेची माहिती मिल्लत नगर भागात पसरल्यानंतर स्थानिक नगरसेवक इम्रान खान यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलास पाचारण केले. दरम्यान स्थानिक युवकांनी पाण्यात उतरुन तातडीनं शोधकार्य सुरु केलं. संध्याकाळी साडे सात वाजताच्या सुमारास शाह आलम याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर रात्री उशीरा शहबाज अन्सारीचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या दुर्दैवी घटनेमुळे मिल्लत नगर भागात शोककळा पसरली आहे. दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबियांसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

Bhiwandi two brothers drowned kamvari river front of mother