डाईंगमधील प्रदूषणाने भिवंडीकर बेजार 

डाईंगमधील प्रदूषणाने भिवंडीकर बेजार 

भिवंडी : भिवंडी शहर परिसरात कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व सायझिंगमध्ये पाणी गरम करण्यासाठी कोळसा व लाकूड जाळण्याऐवजी प्लास्टिक आणि कापडी चिंध्यांचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांना खोकला, दमा त्याचबरोबर अन्य प्रकारचे आजार जडत आहेत. सरकारने प्लास्टिक बंदी केली असली, तरी प्लास्टिकचा थेट वापर डाईंग, सायझिंगमालक अशा प्रकारे करीत असल्याने नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे शहरात प्रदूषित वातावरण निर्माण करणाऱ्या डाईंग मालकांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते यशवंत टावरे यांनी पालिका व कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी वर्गाकडे केली आहे.
 
भिवंडी शहर व लगत असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात डाईंग व सायझिंग कंपन्या आहेत. त्यामध्ये यंत्रमाग कारखान्यांमध्ये तयार झालेल्या कापडावर गरम पाण्यात रंगाची प्रक्रिया केली जाते. त्यासाठी मोठ्या बॉयलरमध्ये दगडी कोळसा व लाकूड टाकून पेटवून पाणी गरम केले जाते; मात्र सध्या दगडी कोळसा व लाकूड महाग झाल्याने डाईंग व सायझिंग मालक जळणासाठी प्लास्टिक व कापडी चिंध्यांचा वापर करीत आहेत.

त्यामुळे भोईवाडा, दर्गा रोड, खोका कम्पाऊंड, कल्याण रोड, खोणी गाव रोड, भादवड, शांतिनगर, कारीवाली रोड, भंडारी कम्पाऊंड, 72 गाला नारपोली, टावरे कम्पाऊंड अशा विविध भागांत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. प्रदूषणामुळे महिला, विद्यार्थी व नागरिकांना खोकला, दमासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. 

भिवंडीत प्रदूषण करणाऱ्या या डाईंग-सायझिंग मालकांवर पालिकेचे अधिकारी व कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे, अशी तक्रार पालिकेचे विरोधी पक्षनेते यशवंत टावरे यांनी केली आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com